महापौरांनी घेतला अधिकाऱ्यांकडून विकास प्रकल्पांचा विभाग निहाय आढावा
Date : 11 Feb 2026
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या ) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्यासह मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त तथा निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. अशोक गराटे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. राजेश भगत, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये यांच्या सह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
शहरात नागपूर महानगरपालिका तसेच राज्य सरकारच्या निधीतून प्रगतीपथावर असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी घेतली. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील मालमत्ता कर तसेच इतर माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले. शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, मनपाच्या उद्यानांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच घनकचरा व्यवस्थापन योग्यरितीने करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी विविध सूचनाही यावेळी करण्यात आल्या. शहरात रेन हार्वेस्टिंगचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे तसेच नियमांमध्ये तशी सक्त तरतूद कराव्या, असेही यावेळी सुचविण्यात आले. शहरातील मोकाट श्वानांच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे तसेच विधान सभा क्षेत्र निहाय प्रत्येकी २ इंग्रजी शाळा सुरू करणे, अंबाझरी तलावातून जलपर्णी कशी हटविण्यात येईल याची उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले.