घराघरातून निघणाऱ्या कचरा संकलनाला मिळणार अधिक बळ
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या उपस्थित मनपाच्या कचरा संकलन वाहनताफ्यात ४० वाहनांचा समावेश
Date : 13 Feb 2026
याप्रसंगी नगरसेवक श्री. दिनेश यादव, नगरसेविका श्रीमती सय्यदा बेगम निझाम अंसारी, श्रीमती पूजा पाठक प्रभारी आयुक्त श्रीमती वसुमना पंत, उपायुक्त श्री. निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, विभागीय स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार, श्री. भोला खोब्रागडे यांच्यासह मनपा व बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बीव्हीजी इंडिया लिमिटेडमार्फत झोन क्रमांक ६ ते १० दरम्यान 'डोअर-टू-डोअर' कचरा संकलन केले जाते. नव्या ताफ्यामध्ये २० इलेक्ट्रिक आणि २० डिझेलवर चालणाऱ्या अशा एकूण ४० वाहनांचा समावेश आहे. ही वाहने जुन्या वाहनांची जागा घेणार असून, या नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाच्या कामामध्ये गती येईल. शहरातील ज्या भागांमध्ये पूर्वी अनियमित कचरा संकलन होत होते, अशा भागांमध्ये या वाहनांचा वापर करून संकलनाच्या कामात सुधारणा होईल. यामुळे परिसरातील कचरा साचण्याची ठिकाणे कमी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत मिळणार आहे.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे म्हणाल्या की, "या नवीन कचरा संकलन वाहनांमुळे शहरातील ओला आणि सुका कचरा संकलन व्यवस्था अधिक सुव्यवस्थित होईल. घराघरातून कचरा उचलण्याचे काम प्रभावीपणे होणार असल्याने शहर अधिक स्वच्छ व सुंदर दिसेल," असा विश्वास ही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकाद्वारे कचरा संकलन व वाहतुकीकरिता दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मे. Antony waste ltd. यांच्याकडे झोन क्र. १ ते ५ आणि मे. बी.व्ही.जी. इंडिया लि. यांच्याकडे झोन क्र. ६ ते १० मधील घराघरांतून कचरा संकलन करून त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.