टीबी निर्मूलनाकडे मनपाची भक्कम वाटचाल; नोंदणीचे ९९ टक्के पेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण
क्षयरोग नोंदणी वाढवा, टीबी मुक्त नागपूर साध्य करा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांचे निर्देश
Date : 16 Feb 2026
प्राप्त आकडेवारीनुसार, वर्ष 2025–26 (जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025) या कालावधीत नागपूर शहरात ७,४१० क्षयरोग रुग्णांची यशस्वी नोंदणी करण्यात आली असून, ९९.४६ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे, ही समाधानकारक बाब आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (NTEP) नागपूर शहरातील अतिजोखमीची लोकसंख्या ४, ८१, ४५८ इतकी ओळखण्यात आली आहे. या अतिजोखमीच्या लोकसंख्येपैकी ४,४६, २७१ व्यक्तींची ‘नि-क्षय’ पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून, नोंदणीचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. तसेच, अतिजोखमीच्या गटातील १,०३ ७०२ व्यक्तींची एक्स-रे तपासणी करण्यात आली, तर १४,४६७ व्यक्तींची NAAT (आधुनिक तपासणी) चाचणी करण्यात आली आहे, यामुळे क्षयरोगाचे लवकर निदान व उपचार शक्य झाले आहेत.
सतत खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, थकवा, छातीत दुखणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आले. तसेच टीबी रुग्णांनी औषधोपचार मध्येच बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण कोर्स पूर्ण करावा व कुपोषण, मधुमेह, तंबाखू व मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये टीबीचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले आले.
मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन क्षयरोग रुग्णांना उपचार कालावधीत पोषण आहार उपलब्ध करून द्यावा. अशा सामाजिक सहभागामुळे किमान १०० टक्के क्षयरोग रुग्णांना पोषण सहाय्य मिळून टीबी मुक्त नागपूरचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठे योगदान मिळेल व वेळेवर निदान व पूर्ण औषधोपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा विश्वास महानगरपालिकेचे क्षयरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा जिचकर यांनी व्यक्त केला आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग नागरिकांना आवाहन केला की, टीबीबाबत गैरसमज दूर करून तपासणी व उपचारासाठी पुढे यावे आणि टीबी मुक्त नागपूर, टीबी मुक्त भारत या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.