अधिकाधिक मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्न करा
मा.महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 17 Feb 2026
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१७) कर विभाग, बाजार विभाग तसेच स्थावर विभाग संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड आणि सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. अशोक गराटे, श्री.गणेश राठोड, श्री. मंगेश खवले, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री.गिरीश गोडबोले, सहायक आयुक्त, श्री. धनंजय जाधव, श्री. विजय थूल, श्री.विकास रायबोले, श्री. राजकुमार मेश्राम, श्री. हरिष राऊत, श्री. प्रमोद वानखेडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव यांच्यासह मनपाचे कर आणि स्थावर विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी मालमत्ता कर विभागाकडून 2025-26 च्या कर आकारणीचे सादरीकरण महापौर निता ठाकरे यांच्यासमोर केले. मनपाद्वारे सर्व झोन कार्यालयाला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, उदिष्टपूर्तीसाठी अधिकारी व कर्मचारी कार्यतत्पर असल्याचे उपायुक्त महसूल श्री. मिलिंद मेश्राम यांनी सांगितले. यावेळी महापौर निता ठाकरे यांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल करण्यात यावा, याशिवाय नियमित कर वसुली वाढविण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन निर्माण होणाऱ्या मालमत्ताना कर निर्धारण क्षेत्रात आणल्यास व मालमत्तेच्या बदलानुरूप मालमत्ता कर सुद्धा वेळीस अद्ययावत करण्यात यावा. शहराच्या विकास कामांकरिता नियमित मालमत्ता कर वसुली होणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने प्रत्येक झोन स्तरावर सहायक आयुक्त यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. झोन स्तरावर नियमाने पालन करून सक्तीने मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. असेही त्यांनी सांगितले.