अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 20 Feb 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अंबाझरी तलाव तसेच एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पतीचे निर्मूलन करण्यात यावे तसेच तलावात येणाऱ्या दूषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्याच्या संदर्भात पाहणी केली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, नगरसेवक श्री. योगेश पाचपोर, नगरसेवक श्री. विजय होले, नगरसेविका श्रीमती रुतिका मसराम, नगरसेविका श्रीमती वर्षा घनश्याम चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गदरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अंबाझरी तलावात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या वनस्पतीचे निर्मुलन करण्यासाठी महापालिकेचे पोकलेन तसेच किरायाने पोकलेन घेऊन वनस्पती काढून टाकावी, यासाठी एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सुचविले. या कामासाठी नवे तंत्रज्ञान व मशिनरी उपलब्ध असल्यास त्यांची चाचणी करून आवश्यकतेनुसार वापर करावा, असेही त्यांनी सुचविले.
अंबाझरी तलावात नाल्यातून दूषित पाणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा स्त्रोत कायमचा बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, वाडी भागातून येणाऱ्या या दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या संदर्भात वाडी नगरपंचायततर्फे जलशुद्धीकरण केंद्र स्थापित करण्याचा प्र्स्ताव आहे. या प्र्स्तावाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी, एनआयटी, वाडी नगरपंचायतचे मुख्याधिकार्यांसह बैठक घेऊन ही समस्या सोडवावी, अशी सूचनाही महापौर श्रीमती ठाकरे यांनी यावेळी केली. या दूषित पाण्यात पोटॅशियम व नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी प्रभावी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे.
अंबाझरी तलावातील जलपर्णी काढून टाकणे तसेच नाल्यातून होणारा दूषित पाण्याचा प्रवाह बंद करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्वरित उपाययोजना करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.