आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांची होणार घराची स्वप्नपूर्ती
पीएम आवास योजना 2.0 मनपातर्फे एएचपीअंतर्गत 518 सदनिकांची ऑनलाईन प्रक्रिया आजपासून
Date : 23 Feb 2026
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत उत्तर नागपूर क्षेत्रातील मौजा नारी येथे 1 बीएचके व 2 बीएचके सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. यात 1 बीएचके सदनिकांचे बांधीव (बिल्टअप एरीया) क्षेत्रफळ 478 चौरस फूट तर 2बीएचके सदनिकांचे बांधीव (बिल्टअप एरीया) क्षेत्रफळ 619 चौरस फूट बांधकाम राहणार आहेत. या योजनेची माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल उईके, प्रकल्प विकासक श्री. गौरव अग्रवाल उपस्थित होते. याप्रसंगी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारचे या योजनेसाठी आभार मानले. या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे आपले स्वप्नातील घर साकार होणार आहे. ही योजना राबविताना पर्यावरण व रेन हार्वेस्टिंग बाबींकडे लक्ष देण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.
पीएम आवास योजना (शहरी) 2.0 मधील भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (एएचपी) 518 सदनिकांच्या प्रकल्प अहवालास केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात 1 बीएचकेच्या सदनिकांची संख्या 210 तर 2बीएचके सदनिकांची संख्या 308 राहणार आहे. यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग व दिव्यांगासाठी राखीव सदनिका राहणार आहेत.
या योजनेअंतर्गत अर्जाची नोंदणी करताना लाभार्थीला 1बीएचकेच्या सदनिकांसाठी 3 हजार रुपये तर 2बीएचके सदनिकांच्या नोंदणीसाठी 5 हजार रुपयांचा ऑनलाईन भरणा करावा लागेल. ही रक्कम लाभार्थीला परत मिळणार नाही.
अडीच लाख रुपये शासकीय अनुदान
या प्रकल्पात 1बीएचके सदनिकांच्या एकूण 4 इमारती राहणार असून 2बीएचकेच्या 11 इमारती राहणार आहेत. या प्रकल्पाचे विकासक म्हणून मे. संदीप डेव्हलपर्स प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1बीएचके सदनिकांची किंमत 15 लाख 51 हजार 672 रुपये एवढी राहणार आहे तर 2 बीएचके सदनिकांची किंमत 21 लाख 1 हजार 748 रुपये राहणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीला अडीच लाख रुपयांचे शासकीय अनुदान मिळणार असल्याने अनुदान वजा जाता 1बीएचके सदनिकेची किंमत 13 लाख 1 हजार 672 तर 2 बीएचके सदनिकेची किंमत 18 लाख 51 हजार 748 रुपये एवढीच राहणार आहे. याशिवाय स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क, अर्बन लोकल बॉडी टॅक्स, मेट्रो सेस, जीएसटी, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, इलेक्ट्रीक मीटर, सोसायटी डिपॉझीट व लिगल चार्जेसची रक्कम अतिरिक्त जमा करावी लागणार आहे.
31 मार्चपर्यंत नोंदणी करता येईल
या प्रकल्पासाठी नोंदणी प्रक्रिया 24 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपासून सुरू होणार असून लाभार्थींना 31 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. सदनिकांचे वाटप ऑनलाईन संगणकीय पद्धतीने होणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या https://www.nmcnagpur.gov.in/ / या संकेत स्थळावर उपलब्ध राहील.
कोण राहील पात्र
1. अर्जदार नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
2. अर्जदार तथा त्यांच्या कुटुंबाच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे.
3. शासन निर्णयानुसार अर्जदार तथा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.