मनपाचा डिजीस्वास्थ्य फाउंडेशनशी सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी नूतनीकरण
Date : 25 Feb 2026
या भागीदारीअंतर्गत शहरातील आठ टेलिमेडिसिन केंद्रांचे संचालन डिजीस्वास्थ्य फाउंडेशन कडून करण्यात येत आहे. या केंद्रांना Western Coalfields Limited (WCL) व HCL Technologies (HCL) यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रांमधून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांशी प्रत्यक्ष (रिअल-टाइम) दूरध्वनी/ऑनलाईन सल्लामसलत, विशेषज्ञांची उपलब्धता तसेच नियोजित रुग्ण मार्गदर्शन सेवा पुरविण्यात येते. यामुळे तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील ताण कमी होऊन गरजू व वंचित घटकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत आहे.
गेल्या वर्षात या टेलिमेडिसिन केंद्रांद्वारे एकूण १३,२४७ रुग्णांची तपासणी व सल्लामसलत करण्यात आली असून, त्यामध्ये ७,२१९ महिला रुग्णांचा समावेश आहे. पुढील एका वर्षात सुमारे १,११,६०० नागरिकांना या आठ केंद्रांमार्फत आरोग्यसेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये विशेषज्ञ सेवांचा विस्तार व समुदाय स्तरावर आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजीस्वास्थ्य फाउंडेशन ही संस्था टेलिमेडिसिन उपाययोजना, शासनासोबतचे सहकार्य आणि संवेदनशील सेवा वितरण यांच्या माध्यमातून आरोग्यसेवेतील दरी कमी करण्याचे कार्य करते. सर्व समुदायांसाठी सुलभ, समतोल आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय आहे.
डिजिटल आरोग्यसेवा ही आजच्या काळाची गरज बनली असून या नूतनीकरणाद्वारे प्रत्येक नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न अधिक बळकट होणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवेचे मॉडेल शहरी आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.
यावेळी नागपूर महानगरपालिका चे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आणि डिजीस्वास्थ्य फाउंडेशन चे गव्हर्नमेंट रिलेशन्स अँड कम्युनिकेशन्स अधिकारी श्रीमती. पूजा पवार उपस्थित होते.