नदी-नाले सफाईच्या कामाला 1 मार्चपासून सुरूवात
आढावा बैठकीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे निर्देश
Date : 26 Feb 2026
पावसाळापूर्वी नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व झोन अधिकाऱ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. अशोक गराटे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व झोन अधिकारी उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार यांनी नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेबद्दल माहिती दिली. शहरात एकूण 227 मोठे नाले व 152 छोटे नाले असून या नाल्यांची सफाई करणे व गाळ काढण्यासाठी आवश्यक पोकलेन, लॉ़ँगब्रुम व टिप्परच्या आवश्यकतेच्या संदर्भात माहिती दिली. शहरात एकूण 14 पोकलेन कामाला लावल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवकांना विश्वासात घ्या
शहरातील नाले सफाई करताना संबंधित प्रभागातील नगरसेवकांना विश्वास घ्यावे तसेच प्र्भागनिहाय कामाचे नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याच्या काठावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी सोयीचे होईल, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे नाले सफाईसाठी स्पायडर मशीनची आवश्यकता लागणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण कराव्या, असेही त्यांनी निर्देश प्रशासनाला दिले.
नाल्याशिवाय पावसाळ्यात काही रस्त्यांवर नियमितपणे पाणी साचले जाते. यामुळे लोकांना वाहतूक करणे कठीण जाते तसेच लोकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. हे स्थळ आधीच हेरून तेथे लोकांना त्रास होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नियमितपणे पाणी साचणार्या ठिकाणांचा एक तक्ता करावा, यामुळे नागरिकांना मदत पोहोचविणे सोईचे होईल, असेही महापौरांनी सांगितले.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉर्म वॉटर लाईन बुजलेल्या राहत असल्याने पावसाचे पाण्याचा प्रवाह बाधित होतो, अशा तक्रारी नेहमीच येत असतात. या सर्व स्टॉर्म लाईन चोकेज गँगकडून तात्काळ साफ करून घ्याव्या. यासाठी प्रत्येक झोनमध्ये चोकेज गँगचे बळकटीकरण करावे, अशी सूचनाही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिल्या.
नालेसफाईचा कालबद्ध कार्यक्रम करा – नरेंद्र (बाल्या) बोरकर
शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून तो पूर्णत्वास न्यावा, अशी सूचना सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी यावेळी केली. या तिन्ही नद्यांची सफाई कालावधीत पूर्ण करण्यासाठी योग्य मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची पूर्तता प्र्शासनाने त्वरित करावी. हे काम झाल्यानंतर या कामाचा अहवाल देण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर द्यावी. जेणेकरून कर्मचाऱ्यांकडून योग्य काम होईल. या कामाचे नियोजन झोन व प्रभाग स्तरावर करावे, असेही सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सांगितले.
आकस्मिक क्रमांक सार्वजनिक करा
पावसाळ्यात पाणी साचल्यास किंवा इतर नैसर्गिक आपत्ती आल्यास महानगरपालिकेने एक आकस्मिक फोन क्रमांक सार्वजनिक करावा, अशी सूचना महापौरांनी केली. जेणेकरून या क्रमांकांवर फोन केल्यानंतर मनपाकडून तात्काळ मदत पोहोचणे सोयीचे होईल.