मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांचा सत्कार
कार्यक्रमासंदर्भात मा.महापौर निता ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Date : 26 Feb 2026
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन वेळा महापौर पद भूषविले असून,समारंभात त्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल तसेच सर्व आमदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात महत्वाच्या सूचना मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गुरूवारी(ता.२६) झालेल्या बैठकीत दिल्या.
नागपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिवसाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने गुरुवारी(ता.२६) बैठक पार पडली. बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. विजय (पिंटू)झलके श्री. सुनील हिरणवार, श्री. संजय बालपांडे, श्री. दिलीप दिवे, श्री.दीपक वाडीभस्मे, श्री.विनोद कन्हेरे, श्री. रामभाऊ आंबुलकर, नगरसेविका श्रीमती दिव्या धुरडे, श्रीमती मंगला खेकरे, श्रीमती भरती बुंदे, श्रीमती सुषमा चौधरी, यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
“पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला २ मार्च २०२६ रोजी ७५ पूर्ण वर्षे होत आहेत. गत ७५ वर्षात शहराच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी महापौर, उपमहापौर यांचा सन्मान करण्यात यावा, हयातीत नसलेल्या पदाधिकारी यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याकरिता नगरसेवक आणि संबधित झोनचे सहायक आयुक्त यांनी माजी महापौर, उपमहापौर यांना सविनय आमंत्रित करावे,तसेच त्यांच्या ये-जा करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांनी दिली.