मनपा इमामवाडा येथे उभारणार आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर
नागरिकांना कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार
Date : 27 Feb 2026
नागपूर शहरातील नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळावी, या दृष्टीकोनातून नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या नेतृत्वात व मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेमध्ये भर पडणार आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना जलद, अचूक आणि परवडणारी निदान सेवा उपलब्ध करून देणे, ज्यामुळे वेळेत उपचार सुरू होऊ शकतील आणि आरोग्य सेवा अधिक परिणामकारक बनेल. नागपूर शहरात उभारण्यात येत असलेल्या आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर प्रकल्पामुळे शहरातील आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण करण्यात मदत होणार आहे.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांच्या सर्व तपासण्या केंद्र सरकार आरोग्य सेवा (CGHS) दरांपेक्षा किमान २० टक्के कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
हा प्रकल्प सार्वजनिक, खासगी व भागीदारीतत्वावर (PPP) राबविण्यात येत असून या सेंटरमध्ये उच्च दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सेवा मानके सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागपुरातील जनतेच्या सहकार्याने हा प्रकल्प नागपूरच्या आरोग्य सेवा व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.