नाग नदी, पोहरा व पिवळी नदी सफाई अभियानाला सुरुवात
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, मनपा आयुक्त यांनी केला शुभारंभ
Date : 04 Mar 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सफाई अभियान सुरू करण्यापूर्वी विधिवत मशीनरीची पूजा करून अभियानाची सुरुवात केली. नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदींचा एकूण लांबी ४९.१७ किलोमीटर एवढी आहे. हे नदी सफाई अभियान १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे.
नागपूर महानगरपालिकाद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांचे पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. सध्या नदी स्वच्छता अभियानात ६ पोकलेन लावण्यात आले आहे.
अभियानांतर्गत नाग नदीच्या पात्राची सफाई केली जाणार आहे. त्यात अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौकातून सेंट झेव्हिअर स्कूल ते संघर्षनगर आणि पाच टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. तसेच पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीच्या पात्राची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे. नदी सफाईचे कार्य सुनियोजित पद्धतीने व्हावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे तसेच स्वछता कार्य जलद गतीने व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशीनरी लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. नदी आणि नाले सफाई करताना गाळ नदी पात्रात परत जाणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
नद्यांच्या पात्रात असलेला गाळाचा उपसा करून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी काम केले जात आहे. यामुळे पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाहण्याची क्षमता वाढते व प्रवाहातील अडथळा दूर करता येते. तसेच खोल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पुराचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. यासाठी पोकलेन मशीन, टिप्पर जेसीबीचा वापर करण्यात येतो. याप्रसंगी महापौरांनी ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरात नदीचा पाणी शिरते, त्या ठिकाणी नदीच्या सुरक्षा भिंती बांधणायचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळ्यात ज्या ठिकाणी पावसाचा पाणी जमा होते, त्या स्पॉटची यादी देखील तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. या प्रसंगी गांधीबाग महल झोनचे सहायक आयुक्त श्री घनश्याम पंधरे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता श्री सतीश गुरमुळे, श्री प्रमोद लिखार, श्री सचिन रक्षमवार, उप अभियंता श्री संजय इंगले, श्री राजेश तेलरांधे, श्री मंगेश मुले, श्री श्याम धर्माळी आणि इतर उपस्थित होते.