चिंचभवनमध्ये मनपा शाळेची नवी इमारत
स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी केली पाहणी
Date : 05 Mar 2026
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, कार्यकारी अभियंता श्री. मनोज सिंग, सहाय्यक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, उप अभियंता श्री. सचिन चमाटे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री. अंकित आष्टनकर, आकांक्षा फाऊंडेशनचे श्री. सोमसुर्व चॅटर्जी, श्री. विनय बगले उपस्थित होते.
नागपुरातील शिवणगाव हे मिहान या प्रकल्पाअंतर्गत अधिग्रहित करण्यात आले आहे. या गावातील मनपाची प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंचभवन भागात ही 7912 चौरस मीटर क्षेत्रफळात या शाळेची इमारत बांधण्यात आलेली आहे. या गावातील गरीब सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या उद्दिष्टाने मनपाने या जागेवर ही इमारत उभारलेली आहे. मूळ प्रकल्पानुसार ही इमारत चार मजली राहणार असली तरी सध्या दोन मजल्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. 10 वर्गखोल्या व 3 प्रयोगशाळांच्या हॉलचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
मराठी शाळांच्या दर्जा सुधारावर भर द्या – शिवानी दाणी
या शाळेच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी यांनी इंग्रजीसोबतच मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. मराठी संस्कृती व भाषा जपण्यासाठी मराठी शाळांचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. मनपाच्या शाळेची ही इमारत कोणत्याही खासगी शाळांच्या दर्जेपेक्षा कमी नाही. भरपूर पटांगणांसह हवेशीर वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांनी ही शाळा एक वरदान ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
आकांक्षा योजनेअंतर्गत शहरात आणखी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच शहरातील प्रतिष्ठित शाळांच्या व्यवस्थापनाकडून इंग्रजी शाळा संचालित करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असेही त्यांनी सांगितले. या इमारतीमध्ये बापूरावजी बोबडे इंग्लिश शाळा (आकांक्षा फाऊंडेशन संचालित) व शिवणगाव प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे वर्ग पुढील शैक्षणिक सत्रापासून भरणार आहे.
या शाळेच्या इमारतीचे वैशिष्ट्ये :
1. इमारतीचे बांधकाम 3965 चौ. मी.
2. एकूण 24 वर्ग खोल्यांचे बांधकाम प्रस्तावित
3. 10 वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण
4. एकूण खर्च 12 कोटी 36 लाख रुपये
5. संगणक कक्ष
6. स्टेम लॅब
7. स्टाफ रूम