गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात
Date : 06 Mar 2026
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतील ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे सोमवार ०९ मार्च २०२६ पासून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे.
Back To Home Page
या मोहिमेअंतर्गत १४ ते १५ वर्ष वयोगटातील (१५ वा वाढदिवस न झालेल्या) मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. शहरातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या विशेष मोहिमेत एकूण ११,२२९ मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही मोहीम ९० दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून त्यानंतर ही सेवा नियमित लसीकरण सत्रामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
सदर एचपीव्ही लस खाजगी रुग्णालयांमध्ये ३ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध असते. मात्र शासनातर्फे नागपूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ५१ UPHC केंद्रांमध्ये ही लस पात्र मुलींना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल असे आव्हाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.