यंत्रणांचा अधिकाधिक उपयोग करून जलपर्णीचे निर्मुलन करा
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 10 Mar 2026
काही दिवसांपूर्वी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अंबाझरीतील पाणी प्रदूषित करणाऱ्या जलपर्णीचे निर्मुलन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा केला होता. यावेळी जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. यानंतर मनपा प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा महापौरांनी मंगळवारी घेतला. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. योगेश पाचपोर, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. राजेश भगत, सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश केवटे उपस्थित होते.
जलपर्णीचे निर्मुलन करण्यासाठी सध्या मनपातर्फे पोकलेन मशीन, लॉँगब्रुमचा वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मनपाकडे असलेल्या या मशीनरीचा दोन शिफ्टमध्ये उपयोग करावा, उन्हाळ्यात या मशीनरीचा जास्तीतजास्त वापर करून जलपर्णीचे निर्मुलन करावे, असे निर्देश ही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.
जलपर्णीचे समूळ नष्ट करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नगरसेवक श्री. योगेश पाचपोर यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी पोकलेनच्या मशीनचा वापर, स्थानिक मच्छिमाराचा उपयोग, जलपर्णीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नगरसेवक श्री. पाचपोर यांच्या सूचनेनुसार जलपर्णी निर्मूलनासाठी प्रशासनाने लक्ष्य ठरवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे महापौरांनी सांगितले.