महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली 'सोनचिरैया' उपजीविका केंद्राची पाहणी
महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळेल
Date : 11 Mar 2026
केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या शॉपिंग मॉलमध्ये नागपूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहातील महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्रातील महिलांची संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी उपजीविका केंद्रातील विविध वस्तू उत्तम, टिकाऊ आणि सुंदर असल्याचे सांगत, नागरिकांना या सर्व वस्तू माफक दरात उपलब्ध व्हाव्यात, तसेच या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा याचा मूळ उद्देश असल्याचेही मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले. केंद्रातील महिला कशा काम करतात हे त्यांनी यावेळी जाणून घेतले. वस्तूंची गुणवत्ता, दर्जा व किंमत योग्य असावी, बाजारातील इतर वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तू अधिक चांगल्या असाव्यात, तसेच नागरिकांनी अधिकाधिक संख्येत केंद्राला भेट द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.
सीताबर्डी येथील सोनचिरैया या उपजीविका केंद्रात (शॉपिंग मॉल) विविध स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू जसे चिवडा-चकली, पापड, शेवया, लोणचे, मसाले असे उत्तमरीतीने व स्वच्छता बाळगून तयार केलेले खाद्यपदार्थाचे प्रकार, घर सुशोभीकरणाच्या वस्तू जसे मॅट, वॉल हँगिंग, रांगोळ्या, पेन्टिग, कंदील, दिवे आदी वस्तू, महिलांकरिता आकर्षक असे लुगडी-पातळ, ड्रेस माफक दरात उपलब्ध आहे व तसेच शिवून देखील मिळेल. देव-पूजेला लागणारे साहित्य, तसेच बाग-बगिच्यात कामाकरिता विविध प्रकारचे खत अशा अनेक उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत.
याठिकाणी महिलांसाठी स्टिचिंग क्लस्टर कार्यरत असून त्याद्वारे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्याची आणि स्वतःचा छोटा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत आहे. घराची जबाबदारी सांभाळत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आपल्या कौशल्याला वाव मिळत असून त्या स्वबळावर कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी योगदान देत आहेत.