नगररचना विभागाने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे निर्देश
Date : 12 Mar 2026
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात मनपाच्या उत्पन्न वाढीच्या संदर्भात नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, , नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव उपस्थित होते.
नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले यांनी गेल्या चार वर्षात नगररचना विभागातर्फे मनपाला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या आर्थिक वर्षात डिसेंबर 2025 पर्यंत नगररचना विभागातर्फे मनपाला 252 कोटी रुपयांचे उत्पन्न झाल्याची माहिती दिली. या रक्कमेत निश्चितपणे वाढ होईल, असेही श्री. गोडबोले यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता असून यात नगररचना विभागाची मोठी भूमिका असल्याचे महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले. मनपाला मिळालेल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता असल्यास तशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या, असे निर्देशही महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले. यावेळी सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी इमारतींचा पुनर्विकास करताना अनेकदा बहुमजली इमारती उभारल्या जातात. परंतु, सिवर लाईनची क्षमता मात्र वाढविली जात नाही. यामुळे एका इमारतीमुळे या परिसरातील इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात नगररचना विभागाने विकासकाला आवश्यक मंजुरी देताना विकासकाने सिव्हर लाईन व इतर नागरी सुविधांची क्षमता वाढविण्यावर निर्बंध घालावे, अशी सूचना श्री. बोरकर यांनी केली. त्याचप्रमाणे नगररचना विभागाचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन या विभागातील मनुष्यबळाची गरज भागवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीच्या संदर्भात चर्चा करण्यात येईल. या विभागाचा मनुष्यबळाचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.