बायोमायनिंग प्रक्रिया पुढील वर्षात पूर्ण करा
आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला विभाग निहाय आढावा
Date : 12 Mar 2026
मनपा आयुक्त डॉ.विपीन यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज पद्धतीने विभाग निहाय बैठकीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, गुरुवारी(ता.१२) मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाची बैठक घेण्यात आली. बैठकीत मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन तसेच पर्यावरणाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात भांडेवाडी येथे सुरू असलेल्या सी एन्ड डी वेस्ट प्रकल्प, दहा एकर जागेवर भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्र, कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ, पशु दहनघाट आदी विविध प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. त्यानुसार बैठकीत सर्व विभागांनी आपल्या विभागाची संघटनात्मक रचना संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. महानगरपालिकेची एनएबीएल मानांकन प्राप्त प्रयोगशाळा विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच मिहान परिसरातून निर्माण होणारे सी एन्ड डी मटेरियल शहरातील सी एन्ड डी वेस्ट प्रोसेसिंग प्लांटमध्ये देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याशिवाय निष्क्रिय (इनर्ट) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फ्लाय अॅश मिसळून खाणींमध्ये टाकण्याचा पर्याय ही तपासण्यात यावा. यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रादेशिक अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सॅनिटरी लँडफिलसाठी राखीव असलेल्या जागेची तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार तेथे बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.
सुसबिडीच्या ९ एकर परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून तयार होणाऱ्या आरडीएफच्या विल्हेवाटीसाठी संयुक्त बैठक घेऊन, ३० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा निर्धारित करण्याचे आयुक्तांनी सांगितले. विशेष म्हणजे, शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. सध्या सुसबिडीच्या मध्यामातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जात आहे. विशेष म्हणजे, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीला येत्या पाच वर्षांकरिता करारबद्ध करण्यात आले आहे.