शहरातील मनपाच्या मैदानांचा होणार कायापालट
संपूर्ण मैदानाची माहिती लवकर सादर करण्याचे महापौर यांचे निर्देश
Date : 12 Mar 2026
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेन्द्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, उपायुक्त श्री. मंगेश खवले, श्री. गणेश राठोड, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, नगररचना संचालक श्री.किरण राऊत, नगर रचनाकार श्री. ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता श्री.प्रशांत सोनकुसरे, श्री. अजय पाझारे, श्री. गिरीश लिखार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, वन संवर्धक श्री.अमोल चौरपगार यांच्यासह एनआयटी आणि मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील जास्तीत जास्त मैदाने विकसित करण्याचा मानस आहे. त्याअनुषंगाने मनपाचे सर्व मैदान आणि नागपूर सुधार प्रन्यासकडून मनपाला हस्तांतरित करण्यात आलेल्या मैदानाला मनपा आणि नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या भेट देऊन मैदानांची सद्यस्थिती, आरक्षण, क्षेत्रफळ आणि ठिकाण यांची सविस्तर माहिती सादर करावी. तसेच सर्व मैदानांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. शहरातील मैदानांचा दर्जा सुधारण्यासाठी एक समिती स्थापन करून, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या एजन्सीची निवड करावी, अशा सूचना मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिल्या. मनपाच्या स्वतःच्या आणि नासुप्रकडून हस्तांतरित झालेल्या मैदानांवर मनपाच्या मालकीचे फलक लावण्यात यावेत, असे सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी सुचविले. मनपा हद्दीतील 204 उद्यानांमध्ये वॉकिंग ट्रॅक, पाणी व्यवस्था, संरक्षक भिंत, लॉन लेव्हलिंग, प्रसाधनगृहे, सेल्फी पॉइंट, योगा शेड, विरंगुळा केंद्र आणि लायब्ररी व इतर मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
उद्यानांमधील 'ग्रीन जिम'ची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांचे नाव आणि मोबाइल क्रमांक असलेले फलक तिथे लावण्यात यावेत. अनेक स्वयंसेवी संस्था मनपाची परवानगी न घेता उद्याने किंवा मैदानांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य लावतात, ज्यामुळे मनपाची बदनामी होते. अशा संस्थांवर लक्ष ठेवून परवानगीशिवाय कोणतेही साहित्य लावू न देण्याचे कडक निर्देश महापौरांनी दिले.