आपली बसच्या कामगारांना थकीत रक्कम देण्यावर तोडगा काढा
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे बैठकीत निर्देश
Date : 12 Mar 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात परिवहन विभागाच्या संदर्भात बैठक झाली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे, मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे यांच्यासह कर्मचारी संघटने पदाधिकारी माजी नगरसेवक श्री. नागेश सहारे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन विभागाअंतर्गत चालणाऱ्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांना 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य सरकारने अधिसूचना काढून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यात बसच्या देखभाल (मेंटनन्स) करण्यासाठी असलेल्या कामगारांचा समावेश केला नव्हता. यात या कामगारांचा समावेश करून मागील 16 महिन्यापासूनची थकीत रक्कम या कामगारांना देण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेतर्फे बैठकीत करण्यात आली. यावर प्रशासनातर्फे नियमाप्रमाणे एक बसमागे एक देखभाल करणाऱ्या कामगाराचे वेतन देण्यास मनपा तयार असल्याचे स्पष्ट केले.
शहरात तीन बस ऑपरेटरतर्फे आपली बस संचालित केल्या जात आहेत. देखभाल कामगारांच्या यादीत काही सोडून गेलेले कामगारांची नावे असल्याचे सांगण्यात आले. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून प्रशासनाने कामगार संघटना व बस ऑपरेटरशी चर्चा करावी, यावर त्वरित तोडगा काढावा, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
त्वरित निर्णय घ्यावा- नरेंद्र बोरकर
अनेक दिवसांपासून परिवहन विभागातील आपली बसच्या कामगारांचा हा प्रश्न प्रलंबित असल्याने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी सूचना सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केली. कामगार संघटनांतर्फे काही कामगार सोडून गेल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन नेमकी वस्तुस्थिती समोर आणावी व यावर तोडगा काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.