देशाच्या हृदयस्थानी असलेल्या राष्ट्रध्वजातून स्वाभिमानाचे पुनरुज्जीवन होईल
कस्तुरचंद पार्कवर २०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Date : 14 Mar 2026
नागपूर महानगरपालिका व लोकमत माध्यम समुहाच्यावतीने ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर २०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. या राष्ट्रध्वजाचे अनावरण मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. १४) झाले. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे, लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष व माजी खासदार श्री. विजय दर्डा, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. नगरसेवक असलम खान उपस्थित होत.
कस्तुरचंद पार्कवर २०० फूट उंचीचा ध्वज उभारून त्यावर राष्ट्रध्वज फडकविण्याची संकल्पना माजी खासदार श्री. विजय दर्डा यांनी मांडली होती. ही संकल्पना महानगरपालिकेच्या सहकार्याने आज साकार झाली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाच्या हृदयस्थानी असलेल्या या शहराचे वेगळे महत्त्व आहे. युवापिढीमध्ये देशाबद्दल स्वाभिमान व अभिमान जागविण्यासाठी अशा पद्धतीने संकल्पना राबविण्याची आवश्यकता आहे. युरोपीय देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी त्या त्या देशाचा राष्ट्रध्वज फडकताना दिसतो. आपल्या देशातही आता हे सुरू झाले आहे. यासाठी माजी खासदार विजय दर्डा यांनी पुढाकार घेतला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या शहराला झिरो माईल सिटी म्हणून ओळख आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणाचे डिझाईन करताना प्रत्येक दिशेला असलेल्या शहरांच्या नावाच्या भिंती येथे उभारण्यात आलेल्या आहेत. ही संकल्पना सुद्धा अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रध्वज असलेल्या या ठिकाणाचे पावित्र्य निश्चितपणे जपले जाईल. असामाजिक तत्वांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
तरुण पिढीला प्रेरणा मिळत राहील : डॉ. विजय दर्डा
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भाषणात डॉ. विजय दर्डा म्हणाले की, राष्ट्रध्वज हा आमचा प्राण आणि आत्मसन्मान आहे. २००९ मध्ये मांडलेली ही संकल्पना २०१६ मधील भूमीपूजनानंतर अनेक अडचणींवर मात करत आज साकारली आहे. या कामात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन व तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हा तिरंगा तरुण पिढीला सदैव राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील. यावेळी त्यांनी कस्तुरचंद पार्क परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला असता, मुख्यमंत्र्यांनी या परिसरात कोणतेही गैरकृत्य होणार नाही, अशी ग्वाही दिली.
नामवंत आर्किटेक्ट शंतनू भल्ला यांनी या स्मारकाचे आरेखन केले असून, स्मारकाच्या भिंतींवर नागपूरपासून विविध दिशांना असलेल्या प्रमुख शहरांची अंतरे दर्शविण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे संचालन संपादक श्रीमंत माने यांनी केले. यावेळी पोलीस बँडच्या पथकाने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले.
प्रारंभी श्री. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे स्वागत श्री. अशोक जैन यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन श्री. श्रीमंत माने यांनी केले.
यावेळी मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त श्री. निर्भय जैन, कार्यकारी अभियंता अल्पना तारेकर (पाटणे) , वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले,मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.तुषार बाराहाते, सहाय्यक आयुक्त श्री.राजकुमार मेश्राम, जनसंपर्फ अधिकारी श्री.मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर आदी उपस्थित होते.