महापौर निता ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी घेतली आगग्रस्तांची भेट
यशवंत स्टेडियम जवळील उदासी आश्रम जवळील चार झोपड्या जळून खाक
Date : 16 Mar 2026
यशवंत स्टेडीयमच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील आगग्रस्तांची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, नगरसेविका श्रीमती धनश्री देशपांडे, सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम उपस्थित होते. या आगग्रस्तांना निवारा व तात्पुरत्या उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित मदत द्यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी या आगीत झोपड्या जळालेल्या कुटुंबियांकडून आगीचे कारण जाणून घेतले व या आगीत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. आगग्रस्त श्रीमती बसंती ठाकूर, श्री. योगेश ठाकूर, श्री. राजेंद्र सिंग सड्डल व श्री. सुरेश ठाकूर यांच्या कुटुंबातील सदस्यांची महापौरांनी भेट घेतली. या आगीत चार झोपड्या पूर्णपणे जळालेल्या आहेत. या कुटुंबातील सदस्यांची तात्पुरती निवार्याची सोय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारकडून तात्काळ मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी आगग्रस्तांना दिले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात माहिती दिली जाईल व आगग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.