मनपाच्या अग्निशमन व विद्युत समितीच्या सदस्यपदी रुपाली ठाकूर
नामकरण समितीच्या अध्यक्षपदी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांची एकमताने निवड
Date : 20 Mar 2026
मनपाची सर्वसाधारण सभा कविवर्य सुरेश भट सभागृहात महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्ती श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
मनपाच्या अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सदस्या श्रीमती मायाताई इवनाते यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी एका सदस्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महापौर श्रीमती ठाकरे यांनी मांडला. यावेळी सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी महापौरांकडे बंद लिफाफ्यात सदस्याचे नाव दिले. महापौरांच्या निर्देशानुसार निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी श्रीमती रुपाली परशू ठाकूर यांच्या नावाची घोषणा केली.
नामकरण समितीच्या अध्यक्षपदी लिला हाथीबेड
मनपाच्या नामकरण समितीच्या अध्यक्षपदी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांची निवड झाल्याची घोषणा महापौर श्रीमती ठाकरे यांनी केली. नामकरण समितीच्या सदस्यपदासाठी महापौरांनी गटनेत्यांकडून सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात नावे मागविली. यानुसार भाजपतर्फे सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, श्री. दिलीप गिर्हे, श्री. विनोद कन्हेरे, श्री. रामदास साहू, श्री. चंद्रकांत खंगार, तर विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर यांनी श्री. दीपक पटेल, श्री. आसीफ सादिक शेख यांच्या नावांची यादी महापौर श्रीमती ठाकरे यांच्याकडे सूर्पूद केली. या समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी सभागृहात केली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनचे अभिनंदन
भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. पिंटू झलके यांनी महापौर श्रीमती निता ठाकरे अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला्. यावेळी महापौरांनी संघर्षातून राजकीय वाटचाल केली असून लोकांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे गौरवोद्गार काढले व त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे श्री. झलके यांनी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर व आयुक्त डॉ. विपीन यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एकमताने सभागृहाने मंजुरी दिली.
अजित पवारांना श्रद्धांजली
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनपाच्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे गेल्या 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद 6 वेळा भूषविल्याचे शोक प्रस्तावात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आजच्या सभेत माजी खासदार व रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी प्रा. रंजना कवाडे, पत्रकार व साहित्यिक प्रा. रणजित मेश्राम, आसाममध्ये भारतीय वायू सेनेत कार्यरत नागपुरातील फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश रविंद्र दुरुगकर यांचे सुखोई एमकेआय लढाऊ विमानात अपघातात झालेल्या वीरमरणाबद्दल शोक संवेदना व्यक्त करण्यात आली. माजी उपमहापौर श्रीमती बहरीनबाई सोनबोईर व काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटकाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या दिवगंतांना सुद्धा यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राकॉच्या गट नेत्या श्रीमती आभा पांडे यांनी सिव्हील लाईन्स येथील मार्गाला अजित पथ नाव देण्याची मागणी केली.
सुनेत्रा पवार व मायाताई इवनाते यांचे अभिनंदन
तेलंगणाचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते यांची राज्यसभेवर अविरोध निवड झाल्याबद्दल ही सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यादा विजेतेपद पटकाविल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे विदर्भ रणजी खेळाडू दानिश मालेवार यांच्या यशाबद्दल या सभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एससी.) पदवी बहाल केली आहे. याबद्दल मान. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश गांधी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.