शोभायात्रेचा मार्गा भाविकांसाठी सुलभ व स्वच्छ ठेवा
आ. प्रवीण दटके आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी केली मार्गाची पाहणी
Date : 20 Mar 2026
पाहणीदरम्यान नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे, व श्री. राजेंद्र राठोड, श्री. गिरीश इखार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह पोद्दारेश्वर राम मंदिर समितीचे श्री. पुनीत पोद्दार मनपा आणि पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शहरात संत झुलेलाल जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि परमात्मा एक सेवक जयंतीनिमित्त मध्य नागपुरात विविध शोभायात्रा निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. प्रवीण दटके यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना मनपातर्फे विविध सुविधा पुरविण्याबाबत आणि आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याताबाबत निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आमदार प्रवीण दटके आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शुक्रवारी शोभायात्राच्या मार्गाची पाहणी केली.
यावेळी मनपा आयुक्त यांनी शोभायात्रेच्या मार्गावरील सर्व रस्ते व त्यावरील खड्डे तसेच चेंबरची दुरुस्ती करावी, झाडाच्या फांद्यांची छाटणी करावी, सर्व विद्युत खांबांवरील पथदिव्यांची दुरुस्ती करावी, मार्गाच्या मध्यभागी असलेले विद्युत केबल हटवावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच शोभायात्रे दरम्यान मार्ग व चौकांची स्वच्छता राखण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्कालीन स्थितीसाठी अग्निशमन दलाची गाडी व रुग्णवाहिकेची सज्जता आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस व सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपिन यांनी दिले.