जलसंवर्धनासाठी सरसावले नागपूरकर
महाराजबाग येथे जल जनजागृती अभियानातून नागरिकांना मार्गदर्शन
Date : 22 Mar 2026
पाणी आणि लिंग समानता – जिथे पाणी वाहते, तिथे समानता वाढते” या यंदाच्या संकल्पनेवर आधारित या अभियानाद्वारे नागरिकांना जलसाक्षरतेचा संदेश देण्यात आला.
या अभियानात ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री. कौस्तभ चटर्जी, कु. सुरभी जैसवाल, श्री. मेहुल कोसुरकर, कु.शीतल चौधरी, श्री. बिश्नुदेव यादव, कु.प्रिया यादव, कु.श्रिया जोगे, श्री. पिनाकी बनिक, श्री. पार्थ जुमडे, श्री. प्रतीक इसंपल्लीवार, श्री. चंद्रप्रकाश सामला, श्री. क्षितीज कुशवाहा आदींनी सक्रिय सहभाग नोंदवून जलसंवर्धनासाठी जनजागृती केली.
यावेळी ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे स्वयंसेवक जागतिक जल दिनानिमित्त हातात फलक घेवून महाराजबाग येथे आलेल्या नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. शुद्ध पाण्याचा योग्यरित्या वापर करावा, पाण्याचा वापर जपून करावा, पाणी वाचविणे आजच्या पाणी संकट समयी महत्वपूर्ण आहे हे समजावून सांगत होते. यावेळी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आगामी उन्हाळ्यात नागपुरात नागरिकांनी पाणी जपून वापरावे याकरिता नागरिकांना जागरूक करण्यात आले. शाश्वत पाणी वापर, वैयक्तिक पाणी वापर कमी करणे आणि सामूहिक जलसुरक्षा सुनिश्चित करण्यावर विशेष भर या अभियानात देण्यात आला.
यावेळी ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चटर्जी यांनी सांगितले की, जगात 2.1 बिलियन शुद्ध पाण्याचा स्त्रोत नागरिकांना उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त जल वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
या अभियानाचा मुख्य उद्देश दैनंदिन जीवनात जलसंवर्धन व शाश्वततेचे महत्त्व पटवून देणे हा होता. पाण्याचा न्याय्य व समतोल वापर हा प्रत्येकाच्या जबाबदार वापरावर अवलंबून असतो, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याची नासाडी टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे तसेच स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण करणे अशा सोप्या व उपयुक्त उपायांवर भर देण्यात आला, ज्यामुळे सर्वांसाठी पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित होऊ शकते.
जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1993 मध्ये रिओ डी जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषदेनंतर सुरू करण्यात आला. या दिवसाचा उद्देश गोड्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे व त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा असून, 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी व स्वच्छता उपलब्ध करून देण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG 6) साध्य करण्यावर भर दिला जातो.