पिवळी आणि नाग नदी संगम स्थळाची मनपा आयुक्तांकडून पाहणी
३० एप्रिलपर्यंत सफाईचे कार्य पूर्ण करण्याचे दिले निर्देश
Date : 24 Mar 2026
पाहणीदरम्यान मनपाचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. विजय थूल, कार्यकारी अभियंता श्री. सचिन रक्षमवार, श्री. उज्वल धनविजय, तहसीलदार श्री. संतोष खंडारे, एनएमआरडीएचे श्री. चिमणकर आणि भूमी अभिलेखचे उपअधीक्षक श्री. विनोद मेरखेडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र), एन.एम.आर.डी.ए. आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना नदी सफाईच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. पिवळी आणि नाग नदीच्या संगमापुढील भागाची स्वच्छता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांना दिले.
यासोबतच शहर आणि ग्रामीण तहसीलदारांनी संयुक्तपणे संगम पॉइंटवरील जमिनीची मोजणी करून नदीचा नैसर्गिक मार्ग मोकळा करावा, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. तसेच पावनगाव येथे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे अर्धवट राहिलेले दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना ही डॉ. विपीन यांनी एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांना केल्या.
गिट्टीखदान येथील नाल्याच्या भिंतीच्या कामाची पाहणी
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या कृष्णनगर, आझाद नगर, गवळीपुरा, गिट्टीखदान या परिसरातील नाल्याच्या सुरक्षा भिंतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी परिसरातील नाला सुरक्षा संदर्भात नाविन्यपूर्ण पद्धतीने नाला भिंत बांधकाम कसे करता येईल, याची शहानिशा करण्यासंदर्भात सूचना केल्या तसेच नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे सुद्धा निर्देश सहायक आयुक्त यांना दिले. यावेळी मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, नगरसेवक श्री. अभिजीत झा, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.