आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवा : आयुक्त डॉ. विपीन
मनपाच्या उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना २०२६ संदर्भात कार्यकारी समितीची बैठक संपन्न
Date : 24 Mar 2026
बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूर शहरामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची ठिकाणे उपलब्ध करणे तसेच आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिल्या.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. राजेश भगत, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, वृक्ष संवर्धक श्री. अमोल चौरपगार, सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहते, सहाय्यक अभियंता श्री. प्रमोद भस्मे, उप अभियंता श्री. प्रकाश यमदे, कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण कोटांगले, समाज विकास विभागाचे श्री. प्रमोद खोब्रागडे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी एमएसयुचे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथून खेरडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ग्रीन नेट (सावलीसाठी जाळी) लावण्यात यावे व नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी स्मार्ट टॉयलेटच्या शेजारी तात्पुरत्या वॉटर किऑस्कची व्यवस्था करण्याचे सुचविण्यात आले व रुग्णांना उष्णतेपासून बचाव मिळावा यासाठी शासकीय व महानगपालिका रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्ड तयार करण्याबाबतही निर्देश देण्यात आले, जेणेकरून उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकेल तसेच उष्माघाताशी संबंधित पोस्टमार्टेम अहवाल थेट पोलिसांसोबत नागपूर महानगरपालिकेला पाठवावे या बद्दल निर्देशित केले. याशिवाय उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले.
तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी ‘कोल्ड शेड’ उभारावेत, जेणेकरून नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल अशा सूचना केल्या, याशिवाय क्रीडा विभाग, घनकचरा विभाग, अभियंता विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून, उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना २०२६ प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आपले मत व सूचना मांडल्या.