स्वच्छता चमूच्या सेवाकार्यासह रामनवमीचा उत्साह द्विगुणित
शहरातील सर्व शोभायात्रा मार्गांवर ३.५ टन कचऱ्याचे संकलन
Date : 27 Mar 2026
थाटात साजरा झालेल्या रामनवमी उत्सवाचा उत्साह नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्वच्छता चमू’ च्या साथीने द्विगुणीत झाला. नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या २५१ कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे. स्वच्छता कार्यादरम्यान ३.५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
Back To Home Page
श्री. रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम नागपुरातील रामनगर चौकातील राम मंदिर यासह विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला लाखो नागपूरकरांनी उपस्थिती दर्शविली. शहरातील विविध भागातून काढण्यात येणा-या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता रहावी, यादृष्टीने महापौर श्रीमती निता ठाकरे, यांनी निर्देशित केले होते. त्यानुसार स्वच्छता चमूने स्वच्छता कार्य पार पाडले. शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला. या संपूर्ण मार्गांवर स्वच्छता राखली जाईल याकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले.