मनपाच्या रुग्णालयांचे पीपीपी तत्वावर बळकटीकरण
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 27 Mar 2026
सार्वजनिक, खासगी व भागीदारी (पीपीपी) तत्वावर मनपाच्या रुग्णालयाची देखरेख, व्यवस्थापन व संचालन करण्याच्या संदर्भात महापौरांनी आज (ता. 27) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.
यावेळी गांधीनगर परिसरात असलेले मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा तिसरा माळा खासगी हॉस्पिटलला पीपीपी तत्वावर देऊन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यासंदर्भात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी पीपीपी तत्वावर इंदिरा गांधी रुग्णालयाचा तिसरा माळा दिल्यानंतर महानगरपालिकेला आर्थिक भार उचलावा लागणार नसल्याचे सांगितले. यात 16 बेडचे आयसीयू कक्ष सुद्धा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाचपावली भागातील पाचपावली सुतिकागृहात या पद्धतीने आरोग्य सुविधा बळकट करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. पीपीपी तत्वावर ही रुग्णालये विकसित केल्यास गरीब व वंचित नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही डॉ. सेलोकर यांनी यावेळी सांगितले.
शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक असे सहा नवे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) उभारण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.