पृथ्वीसाठी एक तास'; नागपुरात 'अर्थ अवर' उत्साहात साजरा
पर्यावरण जनजागृतीसाठी मनपा आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचा पुढाकार वर्ल्ड ट्रेड सेंटरसह विविध दुकानामध्ये अनावश्यक दिवे व विद्युत उपकरणे बंद करून दिला संदेश
Date : 28 Mar 2026
या प्रसंगी वर्ल्ड ट्रेड सेंटर चे संचालक श्री.अनुप खंडेलवाल, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे श्री.कौस्तभ चटर्जी, कु. सुरभी जैसवाल, श्री. मेहुल कोसुरकर, कु. शीतल चौधरी, कु.श्रिया जोगे, कु. प्रिया यादव, श्री. पिनाकी बनिक, श्री.पार्थ जुमडे, श्री.प्रतीक इसम्पल्लीवार, कु. जान्हवी पारास्कर, श्री.चंद्रप्रकाश सामला, कु. क्षितिज कुशवाहा यांच्यासह मनपा विद्युत विभागातील कर्मचारी उपस्थित होते
अर्थ अवर हा जागतिक पर्यावरणीय उपक्रम असून त्याचे आयोजन 'वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड फॉर नेचर'तर्फे केले जाते. हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो, ज्यामध्ये व्यक्ती, समुदाय व व्यावसायिकांना रात्री ८:३० ते ९:३० या वेळेत एक तासासाठी अनावश्यक दिवे व विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले जाते, जेणेकरून पृथ्वीप्रती आपली बांधिलकी दर्शवता येईल.
या उपक्रमाची सुरुवात २००७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे “लाइट्स ऑफ” मोहिमेच्या स्वरूपात झाली होती आणि आज तो १९० पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जाणारा जागतिक उपक्रम बनला आहे.
अर्थ अवरच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन नागपूरचे तत्कालीन महापौर श्री. अनिल सोले यांनी “पौर्णिमा दिवस” मोहिमेची सुरुवात केली होती, जी २०१४ पासून नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनतर्फे प्रत्येक पौर्णिमेला राबवली जात आहे.
या शनिवारी अर्थ अवर अभियानात ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सदस्यांनी दुकानदार, नागरिक व विविध घटकांशी संवाद साधून हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, हवामान कृती, ऊर्जा संवर्धन, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांकडे वळणे, कमी कार्बन जीवनशैलीचा अवलंब व हरित जीवनशैली यांसारख्या विषयांवर जनजागृती केली. वर्ल्ड ट्रेड सेंटर व सीताबर्डी व्यापारी संघाच्या टीमने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वतेसाठी ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि मनपाच्या विद्युत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.