स्वच्छतेत नागपुराला टॉप टेन मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा
स्वच्छता मानांकन उंचावण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचे कडक निर्देश
Date : 30 Mar 2026
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना कचरा स्रोत व विलगीकरण, संकलन व वाहतूक, कचरा हस्तांतरण केंद्रे, रस्ते सफाई, डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचे शास्त्रोक्त निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि उपसा सेवांचे यांत्रिकीकरण, आरआरआर केंद्रे, जीव्हीपी पॉईंटस्, सार्वजनिक व स्मार्ट टॉयलेट्स, बॅकलेन सफाई आणि शहराचे ओडीएफ (ओडीएफ) व जीएफसी ( जीएफसी) मानांकन याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मार्केट परिसरातील दुकाने आणि मोठ्या हॉटेल्सना कचरा विलगीकरण अनिवार्य करण्याचे निर्देश दिले. कोणतेही दुकानदार रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, कचरऱ्यांचे योग्य विलगीकरण करणार यासाठी कडक परिपत्रक काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गरज भासल्यास मार्केट असोसिएशनशी चर्चा करून '4 डस्टबीन' ची सक्ती करण्यात येईल. रस्त्यावरील विक्रेते आणि चायनीज गाड्यांनी घाण केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून दुकाने लावण्यास मज्जाव करण्याचे आदेश त्यांनी दिले.
शहरातील 19 स्मार्ट व 92 सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बीओटी तत्त्वावर दुकाने सुरू करता येतील का, याची चाचपणी करण्याचे सांगितले. तसेच यासाठी सर्व विभागांनी एकत्र आणि पोलिस विभागाची मदत घेऊन समन्वयाने कामे करण्याचे त्यांनी सांगितले. शहरात नागरिकांना अधिकाधिक सार्वजनिक शौचालयाची गरज असून, त्याची संख्या वाढविण्यात यावे, याकरिता जागा शोधण्याचे ही त्यांनी सूचना केल्या. तसेच विविध झोनमध्ये तयार होणाऱ्या ट्रान्सफर सेंटर्सला मोठे शेड लावून त्याचे सौंदर्यीकरण करून जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे मनपा आयुक्त यांनी सुचवले.
याशिवाय शहरातील ४४६ कचरा पॉईंट्सचे (जीव्हीपी) वर्गीकरण करण्यात यावे. तसेच २१७ जीव्हीपी पाँईट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची मदत घेण्याचे आणि झोननुसार स्पर्धा आयोजित करण्याचे सांगितले. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आयईसी उपक्रम आणि पथनाट्ये आयोजित करून नागरिकांना स्वच्छतेबाबत समजविण्यात यावे याबाबत सूचनाही त्यांनी केल्या. आवश्यक पडल्यास विविध ठिकाणी मार्केट असोसिएशन, मोठे होटल, विविध कॉलोनीतील नागरिकांशी स्व:त चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी मार्केट परिसरात 'सी-व्हिजिल'च्या धर्तीवर तक्रार करण्यासाठी नागरिकांना हजार ठिकाणी 'क्यूआर कोड' उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच महानगरपालिकेची रँकिग सुधारण्यासाठी गंभीररित्या कामे करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासोबतच, मनपाच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची व इतर कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांचे 'हेल्थ कार्ड' तयार करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.