शहरातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करा
स्थापत्य समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार यांनी घेतला आढावा
Date : 30 Mar 2026
मनपाच्या स्थापत्य विशेष समितीची बैठक आज (ता. 30) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी स्थापत्य समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार होत्या. यावेळी उपसभापती श्री. प्रदीप पोहाणे, कु. दुर्गेश्वरी कोसेकर, श्री. महेंद्र धनविजय, श्री. चंद्रकांत खंगार, श्रीमती कुमुद गुडधे पाटील, श्रीमती विद्या कन्हेरे, श्रीमती सुनीता तभाने, मोहम्मद मुजतबा अंसारी यांच्यासह मनपाचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, नगररचना उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, नगररचना सहाय्यक संचालक श्री. ऋषीराज जाधव, सहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे यांच्यासह कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार यांनी पीपीटीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले तसेच स्थापत्य विभागात असलेल्या मनुष्यबळाबद्दल माहिती दिली. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून शहरात अनेक विकास प्रकल्प सुरू असून काही प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले. यात क्वेटा कॉलनीतील देवडीया हॉस्पिटलचा समावेश असल्याचे सांगितले.
शहरात सिमेंटचे 33 रस्ते बांधण्याचे काम सुरू असून त्यापैकी 18 रस्ते पूर्ण झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी रिचार्ज पिट बांधण्यात येत असून शहरात आतापर्यंत 70 असे रिचार्ज पिट तयार करण्यात आले आहेत, असेही श्री. तालेवार यांनी सांगितले.
यावेळी स्थापत्य समितीच्या सभापती श्रीमती अश्निनी जिचकार यांनी विकास कामे वेळेत पूर्ण करणे व या कामांची गुणवत्ता कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी सर्व अधिकार्यांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या डीपीसीच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांची माहिती झोन कार्यालयांना उपलब्ध करून द्यावी, यामुळे संबंधित प्रभागातील नगरसेवकांना त्याची माहिती मिळेल, अशी सूचना सभापती श्रीमती अश्विनी जिचकार यांनी केली.