शहरात एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी नियोजन व आढावा बैठक संपन्न
शहरातील १९ हजार विद्यार्थिनींचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट – आयुक्तांचे निर्देश
Date : 31 Mar 2026
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. आयुक्त डॉ. विपिन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे महानगरपालिका शाळा, खाजगी शाळांचे मुख्याध्यापक तसेच झोनल वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती .
बैठकीत मा. आयुक्त डॉ. विपिन यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शाळास्तरावर सविस्तर मायक्रो प्लॅनिंग करून विद्यार्थिनींची अचूक संख्या निश्चित करावी, सर्व शाळांमध्ये HPV लसीकरणाबाबत माहितीपत्रके (IEC Material) वितरित करून विद्यार्थिनी व पालकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच पालकांची संमती मिळविण्यासाठी Parent-Teacher Meeting (PTM) आयोजित करून Consent Form भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच दूरध्वनीद्वारे (Telephonic) समुपदेशन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
यावेळी मा. आयुक्तांनी सांगितले की, उन्हाळी दिवसात पालकांना विश्वासात घेऊन नागपूर शहरातील १९ हजार विद्यार्थिनींचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असून आतापर्यंत 725 मुलींनी लस घेतली आहे.तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना लस देऊन किमान १० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा आजार असून मृत्यूदरही जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्रीमती. मनीषा अतकरे यांनी HPV लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी नाटक, नृत्य, कला आदी माध्यमांचा वापर करून व्यापक स्तरावर अभियान राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच शाळांमध्ये ज्या मुलींनी HPV लस घेतली आहे अशा विद्यार्थिनींची ‘मॉनिटर’ म्हणून नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून इतर विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सुचविले.
मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती. वसुमना पंत यांनी आशा वर्कने घराघरात जाऊन पालकांना HPV लसीबाबत माहिती देऊन त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश दिले.
कार्यक्रमाची सुरुवात नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी PPT सादरीकरणाद्वारे HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व शाळेचे अधिकारी व झोनल वैद्यकीय अधिकारी यांना आवाहन केले की, या मोहिमेस सक्रिय सहकार्य करून शहरातल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा व जास्तीत जास्त मुलींना HPV लस घेण्यासाठी समुपदेशन करावे.
यावेळी मा. जिल्हा माता व बाळ सांगोपण अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या लसीस मान्यता व शिफारस दिल्याचे सांगितले. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अल्का कुमार यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन करून जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली.