जणगणनेची कामे प्राधान्याने करा : डॉ.विपीन
डिजिटल पद्धतीने होणार जनगणना ; फील्ड ट्रेनरचे प्रशिक्षण सुरू
Date : 07 Apr 2026
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, शहर जनगणना अधिकारी श्री. निर्भय जैन, सहायक जनगणना अधिकारी श्री. अमोल चौरपगार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त तथा प्रमुख जनगणना अधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला सक्रीय सहभाग नोंदवून प्राधान्याने कामे पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केले. या प्रशिक्षणात ९१ प्रशिक्षणार्थी असून, सध्या ६० फील्ड ट्रेनरला तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे उर्वरित ३१ प्रशिक्षणार्थ्यांना ९ एप्रिल पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना कोणतीही त्रुटी राहू नये व प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. कर्मचाऱ्यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करावा. तसेच डेटा संकलनाची पद्धत नीट समजून घेऊन फिल्डवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. विपीन यांनी दिल्या. सर्वांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे ही त्यांनी आवाहन केले.
जनगणनेच्या कार्यात नागपूर महानारपालिकातर्फे ४५०० प्रगणक आणि ७०० पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक प्रगणकाला साधारणतः ८०० नागरिकांकडून माहिती घ्यायची आहे. तसेच प्रशिक्षणार्थी यांना ८ एप्रिल रोजी क्षेत्रीय भेट आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनर श्री. सुभाष उपासे, श्री. प्रणय कडुलकर, श्रीमती दीपिका गायकवाड आणि श्री रामचंद्र निंबाळकर यांनी फील्ड ट्रेनरला प्रशिक्षण दिले.