मनपाच्या संकेतस्थळावर न्यायालयीन प्रकरणांची माहिती उपलब्ध करा
विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे यांचे निर्देश
Date : 07 Apr 2026
या बैठकीला उपसभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, सदस्य श्रीमती धनश्री देशपांडे, श्रीमती शारदा बारई, ॲड. निलेश गायधने, ॲड. शैलेंद्र डोरले, ॲड. स्नेहल ठाकरे, श्री. पवन कोये यांच्यासह उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त श्याम कापसे, श्री.हरीष राऊत, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, विधी अधिकारी श्री. सूरज पारोचे, कार्यकारी अभियंता श्री.अजय डहाके, श्री. विजय गुरुबक्षाणी, श्रीमती अल्पना पाटणे, श्री. श्रीकांत वाईकर, श्रीमती अश्विनी येलचेटवार, श्री. गिरीश लिखार इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
न्यायालयीन प्रकरणांचा ताण कमी करण्यासाठी कर आकारणी किंवा इतर छोटे वाद मनपा स्तरावर तडजोडीने सोडविता येतील का, याबाबत स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना सभापतीं कु. निधी तेलगोटे यांनी संबंधित विभागाला दिल्या. उपसभापती यांनी हंसापुरी येथील एका घराच्या बांधकामामुळे रस्ता बाधित झाल्याच्या विषयी समितीच्या निदर्शनास आणला यावर मा. सभापती यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपायुक्त(मालमत्ता) यांना दिले. तसेच, 'कंझर्वेशन लेन' लीजवर दिलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी उपायुक्त(मालमत्ता) यांनी करून त्याचा अहवाल विधी समितीपुढे पुढील बैठकीत सादर करावा, असे आदेश दिले.
शहरातील वाठोडा, झिंगाबाई टाकळी यांसह विविध भागांतील आठवडी बाजार आणि व्हीएनआयटी परिसरातील अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटवून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश यावेळी सभापती यांनी सहायक आयुक्त(अतिक्रमण) यांना दिले.
तत्पूर्वी बैठकी सभापती कु.निधी तेलगोटे यांनी मनपा प्रशासक कार्यकाळातील निर्णयाची माहिती, तसेच प्रत्येक विभागाने मंजूर केलेले करार व निविदातील जमीन वाटप / भाडेपट्टे / हस्तांतरण, न्यायालयीन प्रकरणांतील निर्णय, तडजोड किंवा माघार, महसूल व कर संबंधित निर्णय, अतिक्रमण हटविण्याची कारवाई, अधिकारांचे प्रतिनिधित्व, न्यायालयात दाखल असलेले विविध प्रकरण, प्रलंबित प्रकरण व त्याची सध्याची स्थिती, पुढील सुनावणी तारीख आणि संबंधित अधिकारी व वकील यांची माहिती घेतली. याचबरोबर महानगरपालिकेच्या सर्व मालमत्ता व त्यावरील अतिक्रमण, त्यातील प्रलंबित प्रकरणे, सुरु असलेल्या कायदेशीर कारवाई, न्यायालीन प्रकरणात मनपातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांची यादी त्यांच्याकडे असलेले प्रकरण व कामगिरीचा संक्षिप्त अहवाल यांची माहिती त्यांनी घेतली.