विविध विकास कामांची महापौरांकडून पाहणी
पावसाळापूर्व कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
Date : 07 Apr 2026
मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता. 7) भांडेप्लॉट येथे सुरू असलेल्या डिव्हायडर व डायव्हर्शनचे काम, उमेरड मार्गावरील ईपीएफओ कार्यालयासमोरील शितला माता मंदिर मार्गावर असलेल्या उद्यानाच्या कामासह सुरेंद्रगड भागात सुरू असलेल्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार श्री. मोहन मते, पोलीस उपायुक्त श्री. लोहित मतानी, नगरसेवक श्री. पिंटू झलके, प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका श्रीमती दर्शनी धवड, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंशी, माजी नगरसेवक श्री. तानाजी वनवे, श्री. दीपक धुरडे, माजी नगरसेविका श्रीमती स्नेहल बिहारे माजी नगरसेवक श्री. नागेश सहारे, यांच्यासह उपायुक्त श्री. राजेश भगत, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वृक्ष संवर्धक श्री. अमोल चौरपगार उपस्थित होते.
सुरेंद्रगड परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईची मोहिमेअंतर्गत काम सुरू आहे. महापौरांनी या कामाच्या मोहिमेला सुरूवात केली आहे. यावेळी नगरसेवक व प्रशासनाने मिळून पावसाळापूर्व कामे संपविण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. नाल्यातील गाळ काढल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कचऱ्याची त्वरित उचल करावी, जेणे करून गाळ पुन्हा नाल्यात जमा होणार नाही.
महापौरांनी भांडे प्लॉट येथे उड्डान पुलाचे काम सुरू असल्याने बापूनगर, माकोडे लेआऊट मधील नागरिकांना डिव्हायडर व डायव्हर्शनचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी त्रास होत आहे. या कामाची पाहणी करून नागरिकांना या डायव्हर्शनचा कमीतकमी त्रास कसा होईल, याद़ष्टीने नियोजन करावे, असे निर्देश दिले. यावेळी आमदार श्री. मोहन मते व पोलीस उपायुक्त श्री. लोहित मतानी यांनी सुद्धा काही सूचना करून नागरिकांना सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
मनपाचा स्तुत्य उपक्रम
महापौरांनी ईपीएफओच्या समोर शितला माता मंदिरासमोर मनपाने 2022 मध्ये वृक्षारोपण अभियानाअंतर्गत लावलेल्या झाडांची पाहणी केली. या ठिकाणी पिंपळ, कडूनिंब, करंजचे रोपे लावले होते. आता या जागेवर जवळपास 1 हजारवर झाडे डौलाने उभे आहेत. मनपाने हाती घेतलेल्या या वृक्षारोपण मोहिमेचे हे चांगले यश असल्याची प्रतिक्रिया महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केली तसेच उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मनपाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण अभियानाची माहिती वृक्ष संवर्धक श्री. अमोल चौरपगार यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक श्री. नागेश सहारे उपस्थित होते.