शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करा
वैद्यकीय आरोग्य समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांचे निर्देश
Date : 08 Apr 2026
बैठकीस उपसभापती श्री. श्रीकांत आगलावे, समिती सदस्य श्रीमती पुजा भुगांवकर, श्रीमती रजनी वानखेडे, श्री. प्रमोद ठाकुर, श्रीमती भावना लोणारे यांच्यासह घनचकरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मनपा मुख्यालय आणि झोनचे झोनल स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत शहरातील घराघरातून संकलित होणाऱ्या कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक व अंतिम विल्हेवाट प्रक्रियेचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर नागरिकांनी कचरा टाकू नये याकरिता उपाय योजना करण्यात यावे, नाला सफाईमध्ये गती वाढविण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, मनपातर्फे विविध ठिकाणी करण्यात आलेले सौदर्यीकरणाची माहिती नगरसेवकासह नागरिकांना देण्यात यावी तसेच घराघरातून निघणारा कचरा संकलन यंत्रणा अधिक कार्यक्षम करून स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यात यावी, असे निर्देश सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे, कामावर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावे, तसेच सफाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन कामकाज अधिक सुलभ करण्याच्या सूचना उपसभापती श्री. श्रीकांत आगलावे यांनी विभागाला दिले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधा व अडचणी सोडविण्यावरही भर देण्यात यावे, जुने व बंद पडलेले कचरा संकलन वाहन तातडीने बदलविण्यात यावे अशा सूचना समितीचे सदस्य श्री. प्रमोद ठाकूर यांनी केल्या.
तत्पूर्वी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची संपूर्ण माहिती समितीला दिली. यावेळी पीआययूचमूतर्फे बैठकीत समितीला स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2025-26 अंतर्गत 'स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर सिटी एक्सलन्स' बाबत नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या कचरा स्रोत व विलगीकरण, संकलन व वाहतूक, कचरा हस्तांतरण केंद्रे, रस्ते सफाई, डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचे शास्त्रोक्त निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि उपसा सेवांचे यांत्रिकीकरण, आरआरआर केंद्रे, जीव्हीपी पॉईंटस्, सार्वजनिक व स्मार्ट टॉयलेट्स, बॅकलेन सफाई आणि शहराचे ओडीएफ (ओडीएफ) व जीएफसी ( जीएफसी) मानांकन याबाबत माहिती देण्यात आली.