एका स्वरयात्रेची सांगता - महापौर श्रीमती निता ठाकरे
Date : 12 Apr 2026
महाराष्ट्राला भूषण ठरलेल्या मंगेशकर कुटुंबातील आशा भोसले यांचा गायिका म्हणून प्रवास मोठा खडतर व आव्हानांनी भरलेला होता. गानकोकीळा लता मंगशेकर यांची धाकटी बहिण असतानाही त्यांनी गायनाच्या क्षेत्रात आपले एक वेगळे परंतु अजरामर स्थान निर्माण केले. यासाठी त्यांनी संघर्षही केला. मराठीत भावगीतांपासून तर लावणीपर्यंत व हिंदीत गझलपासून तर प्रणय गीतांपर्यंत सार्या गीतांना त्यांनी दिलेला स्वर कायम रसिकांच्या केवळ मनातच नव्हे तर त्यांच्या मर्मबंधातील ठेव झाला आहे.
पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश हे गीत जितके भक्तीमय तन्मयतेने त्यांनी गीत गायिले आहे. त्याच ठसक्यात त्यांनी बुगडी माझी सांडली गं ही लावणी म्हणत मराठी रसिकांना वेड लावले होते. हिंदी चित्रपटातील गीतांना तर रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळविले. उमराव जान मधील दिल चीज क्या है ही गझल ऐकताना आशाताईंचा अविट स्वर अजूनही रसिकाच्या मनात दरवळत आहे. त्याचवेळी हावरा ब्रिज चित्रपटातील आईए, मेहरबान, बैठीये जाने जान म्हणत आपल्या लडीवार स्वराने युवकांना घायळ केले होते. अशा या चतुरस्त्र गायिकेने आपल्या सहा दशकंच्या स्वरयात्रेत स्वराच्या प्रत्येक रंगात आपले भरीव योगदान दिले आहे. पार्थिव रुपाने आशाताई आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या अजरामर स्वरांची आठवण आपल्या मनात कायम तेवत राहील, असेही महापौर श्रीमती ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.