महापौर निता ठाकरे यांनी घेतला दहन घाटांच्या सद्यस्थितीचा आढावा
नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश
Date : 15 Apr 2026
या बैठकीला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त श्री.अंकित, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी घाटांचे सौंदर्यीकरण करण्यासोबतच भविष्यातील गरजा ओळखून विकासकामे करण्याचे निर्देश दिले. तसेच घाटांच्या स्वच्छतेसाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय, घाटांवर कार्यरत कर्मचारी संख्या आणि तिथे उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांचा महापौरांनी सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पाचे अंतिम सादरीकरण पुढील बैठकीत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तत्पूर्वी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण २१ घाट आहेत. हे घाट अधिक सुंदर आणि इतर प्रगत शहरांप्रमाणे सुसज्ज बनविण्यासाठी 'पीएमसी'ची (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंन्सल्टंट) नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमसीमार्फत सर्व घाटांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन घाटांच्या सौंदर्यीकरणाची योजना तयार करण्यात येत असल्याचेही आढावा बैठकीत त्यांनी माहिती दिली.