सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली लावा
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
Date : 15 Apr 2026
या बैठकीला राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री. प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त श्रीमती सुकेशणी तेलगोटे, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर यांनी महापौर श्रीमती निता ठाकरे यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सफाई कामगारांचे १९७५ पासून ते सद्यस्थितीपर्यंत असलेले प्रलंबित प्रकरणे, खारीज प्रकरणे, ऐवजदार आणि अधिसंख्य प्रकरणे मार्गी लावण्याकरिता सकारात्मक विचार करण्यात यावा. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी झोन स्तरावर किंवा मनपा शाळांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करावी, असेही त्यांनी सुचविले. यासोबतच मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा, आरोग्य विमा योजना लागू करावी आणि रिक्त पदांची भरती करण्याबाबत मनपाने सकारात्मक निर्णय घ्यावा, आदी मागण्या श्री. सतीश डागोर यांनी बैठकीत मांडल्या.
यावर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सफाई कामगारांचे सर्व प्रलंबित प्रकरण तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन श्री. सतीश डागोर यांना दिले. तसेच मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी देखील प्राधान्यक्रमानुसार सफाई कामगारांचे सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले.