‘सातनवरी’च्या धर्तीवर शहरातील झोपडपट्ट्या होणार ‘डिजिटल’ : महापौरांचा पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा मानस
व्हॉइस संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट : लंडन येथील तज्ज्ञांकडून नागपूरच्या विकासाचे कौतुक
Date : 16 Apr 2026
महाराष्ट्र शासनाने सातनवरी गावाला विकसित करण्याची जबाबदारी 'व्हॉइस' (Voice of Indian Communication Technology Enterprises) या संस्थेला दिली होती. संस्थेने आयओटी (IoT) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने या गावात आरोग्य, शिक्षण, स्मार्ट पथदिवे (Street Lights) यासह १८ प्रकारचे डिजिटल सोल्यूशन्स उपलब्ध करून दिले आहे. या आधुनिक बदलांमुळे सातनवरी गाव आज जगप्रसिद्ध झाले असून, हे मॉडेल पाहण्यासाठी लंडन येथील तज्ज्ञांचे शिष्टमंडळ नागपुरात आले असून, या तज्ज्ञांनी महापौरांशी चर्चा करून सातनवरीच्या धर्तीवर शहरात बदल घडविण्या बाबत सकारात्मकता दर्शविली.
चर्चेदरम्यान महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, झोपडपट्टी भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सोप्या पद्धतीने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स अत्यंत प्रभावी ठरू शकतात. शहरातही अशीच संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त करताना महापौरांनी सुचविले की, सुरुवातीला शहरातील १० झोन मधून निवडक भागांमध्ये 'पायलट बेसिस'वर हा प्रकल्प राबवून विकासाचा आराखडा तयार केला जावा, तसेच राज्य शासनाकडूनही याकरिता आर्थिक सहकार्य घेण्याचे सुचविले.
व्हॉइस संस्थेचे प्रमुख आणि भारत सरकारचे सेवानिवृत्त सचिव श्री. आर. के. भटनागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांची भेट महापौर कार्यालयात घेतली. यावेळी मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचे प्रो. स्टीफन हॅल्स (Stephen Hailes), प्रो. हेलन हॅल्स (Helen Hailes), युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजीलाचे प्रो. गेरार्ड परर (Gerard Parr) आणि डीआरडीओचे माजी महानिदेशक श्री. के. डी. नायक उपस्थित होते. प्रो. गेरार्ड परर यांनी नागपूरमध्ये होत असलेल्या विकासाचे आणि प्रशासकीय दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले.
तत्पूर्वी श्री. भटनागर यांनी सातनवरी गावातील बदलांची माहिती देताना सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. हेच तंत्रज्ञान शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राबविल्यास तेथील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊ शकते. महापौरांनी या शिष्टमंडळाच्या सातनवरी गावाला भेट देण्याचे निमंत्रणही स्वीकारले आहे.