झोन सभापतीपदी भाजपचे ८ तर २ जागी काँग्रेसचे सभापती
अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रुपाली ठाकूर
Date : 17 Apr 2026
शहरातील दहा झोन सभापती तसेच अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदासाठी आज (ता. 17) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी काम पाहिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण मेहरे निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.
मनपाच्या दहाही झोन सभापतीपदासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी झोनच्या अनुक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया राबविली. यात लक्ष्मीनगर झोन क्र.१च्या सभापतीपदासाठी भाजपच्या श्रीमती तारा (लक्ष्मी) ओमप्रकाश यादव बिनविरोध निवडून आल्या. धरमपेठ झोन क्र.२ च्या सभापतीपदासाठी भाजपच्या श्रीमती धनश्री देशपांडे यांचा बिनविरोध निवडून आल्या. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमाननगर झोन क्र.३च्या सभापतीपदासाठी भाजपच्या श्रीमती ज्योती देवघरे बिनविरोध निवडून आल्या. धंतोली झोन क्र.४ च्या सभापतीपदी भाजपच्या श्रीमती भारती बुंदे यांची अविरोध निवड झाली. नेहरूनगर झोन क्र.५ च्या सभापतीपदी भाजपच्या श्रीमती सीमा ढोमणे यांची अविरोध निवड झाली. गांधीबाग-महाल झोन क्र.६च्या सभापतीपदी भाजपच्या श्रीमती उमा देशमुख यांची अविरोध निवड झाली. सतरंजीपुरा झोन क्र.७ च्या सभापतीपदी भाजपच्या श्रीमती अभिरुची राजगिरे यांची अविरोध निवड झाली. लकडगंज झोन क्र.८च्या सभापतीपदी भाजपच्या श्रीमती महेश्वरी बिसेन यांची अविरोध निवड झाली. या सर्व विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेसचे उमेदवार 2 ठिकाणी विजयी
आशीनगर झोन क्र.९ च्या सभापतीपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक घेण्यात आली. एमआयएमच्या श्रीमती अलिशा फहिम खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसतर्फे श्री. आसिफ सादिक शेख यांनी अर्ज दाखल केला होता. सभापतीपदासाठी दोन उमेदवारी अर्ज आले असल्याचे निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी स्पष्ट केले. निर्धारित वेळेत एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे न घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या झोनमधील एकूण १६ नगरसेवक निवडणुकीच्यावेळी सभागृहात उपस्थित होते. पीठासीन अधिकाऱ्यांनी हात उंच करून मतदान करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार पहिल्यांदा एमआयएमच्या श्रीमती आलिशा फहिम खान यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांच्या बाजूने सात जणांनी मतदान केले. यानंतर काँग्रेसचे श्री. आसीफ सादिक शेख यांच्या बाजूने 8 जणांनी मतदान केले. निवडणुकीत बसपाच्या श्रीमती हर्षला जयस्वाल यांनी कॉंग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. भाजपचे नगरसेवक श्री. किरण मनपिया तटस्थ राहिले. यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार श्री. आसिफ सादिक शेख यांना विजयी घोषित केले. तर मंगळवारी झोन क्र.१० च्या सभापतीपदी काँग्रेसच्या श्रीमती सीमा डवरे अविरोध निवडून आल्या. या दोन्ही विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक श्री. विवेक निकोसे, श्रीमती भावना लोणारे, श्रीमती कल्पना द्रोणकर व श्री दिनेश यादव उपस्थित होते.
श्रीमती रुपाली ठाकूर अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती
अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी भाजपतर्फे श्रीमती रुपाली ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच उपसभापती पदासाठी श्री. लखन येरावार यांनी अर्ज दाखल केला होता. सभापतीपदी श्रीमती रुपाली ठाकूर तर उपसभापतीपदी श्री. लखन येरावार यांच्या नावांची घोषणा पीठासीन अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी केली. दोन्ही विजयी उमेदवारांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.