उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनेची कडक अंमलबजावणी
Date : 17 Apr 2026
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आंतरविभागीय बैठकीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्या इतर अधिकारी व कामचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, “शहरातील उष्णतेच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नागरिकांच्या गरजांनुसार उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. विशेषतः असुरक्षित गटांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जातील.”या भागीदारीमुळे नागपूर शहर उष्णतेविरुद्ध अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या अंतर्गत, पुढील दोन महिन्यांत iFOREST आणि नागपूर महानगरपालिका संयुक्तपणे विद्यमान उष्णता कृती आराखड्याचा आढावा घेऊन तो अधिक सक्षम करतील. तसेच शहरासाठी सर्वसमावेशक आणि एकत्रित उष्णता व शीतलता कृती आराखडा (IHCAP) तयार केला जाईल. हा आराखडा भविष्यातील उष्णतेच्या लाटांना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवेल. बैठकीत आरोग्य विभाग, अग्निशमन सेवा, नगर नियोजन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, वाहतूक पोलीस, झोपडपट्टी विभाग आणि समाज कल्याण विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते. उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी समन्वयित आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.