शहरातील अतिक्रमण निर्मुलनासाठी मनपाचा “मिशन १०० डे”
अवैध होर्डिंग अन् अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणार
Date : 18 Apr 2026
शहरातील अतिक्रमण आणि अवैध हार्डिंग संदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात मनपाच्या प्रवर्तन विभाग, आकाशचिन्ह परवाना विभाग जिल्हाधिकारी प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत उप जिल्हाधिकारी श्री. सुरेश बगळे, श्री. नवले, राज्य शासनाच्या सार्वजिक बांधकाम विभागाचे श्री. चंद्रशेखर सिन्हा, मनपाचे उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, मंगेश खवले, गणेश राठोड, अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, विजय थूल, विकास रायबोले, तहसीलदार(शहर) श्री.संतोष खांडरे, कार्यकारी अभियंता श्री श्रीकांत वाईकर, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता श्री.लक्ष्मीकांत राऊलकर आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन कारवाई, हॉकर्स व फेरीवाले यांना पर्यायी जागा देणे, जागा निश्चितीकरण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी मिशन १०० डे मोहिमेंतर्गत नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. मोहिमेंतर्गत सर्वप्रथम मनपा, एनएचएआय, एनएचपीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी यांच्या रस्त्यावर कोणकोणत्या ठिकाणी अतिक्रमण आहे याची पाहणी करावी, तसेच फुटपाथवरील अतिक्रमण काढणे, रस्त्यावरील अवैद्य बांधकाम काढणे, रस्त्यांवरील अवैद्य बांधकाम साहित्य काढणे, अवैद्य होर्डिंग काढण्यासह सर्व प्रकारच्या अतिक्रमण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन करण्याचे निर्देश डॉ. विपीन यांनी दिले.
यामोहिमेद्वारा नागरिकांना सुरक्षित, मोकळे आणि सुलभ रस्ते उपलब्ध होतील. फेरीवाले यांना कायदेशीर व सुरक्षित व्यवसायाची संधी मिळेल आणि शहरासाठी दीर्घकालीन सुधारणा व विकास आराखडा तयार करून नागपूरला स्मार्ट, सुव्यवस्थित आणि आधुनिक महानगर बनवण्याचा संकल्प पूर्ण होईल असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
बैठकीत सर्वप्रथम उपायुक्त श्री. मंगेश खवले आणि श्री. मिलिंद मेश्राम यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माधमातून मिशन १०० डे बद्दल माहिती दिली. उपायुक्त श्री. मंगेश खवले यांनी सांगितले की, मिशन १०० डे हे नागपूर शहरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचान्यांसाठी सुरक्षित व मोकळे मार्ग निर्माण करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश शहरी शिस्त प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे.