उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर परिवहन समितीचा राहिल भर
मनपाच्या परिवहन समितीतर्फे सत्र 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर
Date : 20 Apr 2026
मनपाच्या परिवहन विभागाचा सन 2025-26 या वर्षाचा 418 कोटी 40 लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प व सन 2026-27 या वर्षासाठी 575 कोटी 58 लाख रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांना सादर केला. यावेळी निवेदन करताना श्रीमती खेकरे यांनी मार्च 2027 अखेर परिवहन विभागाची शिल्लक 68 लाख 38 हजार रुपये राहणार असल्याचे सांगितले. परिवहन विभागाच्या येत्या आर्थिक वर्षात करावयाच्या विविध योजनांचे कार्यान्वयन तसेच विभागाची आर्थिक घडी नीट बसविण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे नागपूर शहरातील व शहराच्या लगतच्या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित, आरामदायक, पर्यावरणपूरक व परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. समिती सभामती श्रीमती खेकरे यांनी बजेटची एक प्रत मा.महापौर यांना देखील दिली.
बस स्थानकांमध्ये व्यापारी संकुल
शहरात तसेच शहराच्या बाहेर असलेल्या परिवहन विभागाच्या डेपोच्या जागेचा उपयोग व्यापार संकुलासाठी करून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सभापती श्रीमती खेकरे यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मोरभवन बसस्थान 1 व 2 त्याचप्रमाणे पटवर्धन, लकडगंज (मातृशक्ती), हिंगणा, वाडी, खापरी डेपोमध्ये व्यापारी संकुल उभारून परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात 40 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे श्रीमती खेकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे परिवहन विभागाच्या बस थांब्यावर असलेले क्युओस सेंटरचे रुपांतर छोट्या स्वरुपातील व्यापार केंद्रामध्ये करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यातून कॉफी सेंटर, सुविधा केंद्र, झेरॉक्स केंद्राकरीता ही जागा भाडेतत्वावर देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सध्या परिवहन विभागाच्या ताफ्यात 385 ई-बसेस, डिझेलवर धावणार्या 150 मिडी बसेस व 45 मिनी बसेस अशा एकूण 580 बसेस असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील वाढती वाहनसंख्येमुळे वाढणारे प्रदूषण व रहदारीचा प्रश्न जटील होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अधिक सूसुत्रता आल्यास पर्यावरण चांगले राखण्यास मदत होईल. मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 250 स्टँडर्ड वातानुकुलित विद्युत बस खरेदीसाठी 137 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यापैकी आतापर्यंत 105 बसेस परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. मान. पंतप्रधान ई-बसेस योजनेअंतर्गत 150 ई मिडी बसेस मंजूर झाल्या आहेत. बसेस शहराला मिळाल्या असून या बससेच्या सेवेचे मान. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लोकार्पण झाले आहे. मान. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून फ्लॅश चार्जिंग संचालित आर्टिक्युलेटेड 25 बसेस मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे सभापती श्रीमती खेकरे यांनी सांगितले.