अग्निशमन विभागाच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अग्निसुरक्षा सप्ताह निमित्त नागपूरमध्ये जनजागृती रॅली
Date : 20 Apr 2026
यावेळी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, नॅशनल फायर सर्विस कॉलेजचे संचालक डॉ. ए.आर. सोनटक्के, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अग्निशमन व विद्युत विशेष सेवा समितीच्या सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, नगरसेवक श्री. नागेश मानकर श्री. बाबाराव तायडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले.
मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते यांच्या नेतृत्वात ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह गेल्या १४ एप्रिलपासून शहरात मनपाच्या अग्निशमन विभागामार्फत जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. या सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी आज (ता.२०) शहरातील विविध भागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. मनपाच्या मुख्यालयातून सोमवारी सायंकाळी 6 वाजता रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात जाऊन या रॅलीच्या माध्यमातून लोकांना आगीच्या घटना तसेच नैसर्गिक आपत्तीच्यावेळी घ्यावायच्या उपाययोजना व काळजीची माहिती देण्यात आली. रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी, विविध परवानाधारक संस्था, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या रॅलीत मिनी फायर टेंडर, फायर टेंडर-५००० लि., हॅजमेंट व्हॅन (NFSC), बाऊजर-१६००० ली. , D.C.P. टेंडर, हॅड्रोलिक प्लॅटफार्म (HP), क्रॅश फायर टेंडर (CFT) , टर्न टेबल लेंडर (TTL), Trup कॅरीयर, बोट चे प्रदर्शन करण्यात आले.
या रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याचे मार्गदर्शन करणे तसेच सुरक्षित नागपूर घडवण्यासाठी सामूहिक सहभाग वाढवणे हा आहे.
असे केले मार्गक्रमण
मनपा मुख्यालयातून निघालेली ही रॅली लिबर्टी सिनेमा चौक, छावणी चौक, पागलखाना चौक, पोलीस लाईन टाकळी तलाव, पोलीस लाईन टाकळी चौक, सेमिनरी हिल्स चौक, जपानी गार्डन चौक, रवीनगरचौक, लॉ कॉलेज चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकर नगर चौक, बजाज नगर चौक, लक्ष्मी नगर चौक, माटे चौक, प्रतापनगर चौक, छत्रपती चौक, अजनी चौक, रहाटे कॉलनी चौक, लोकमत चौक, झाशी राणी चौक, संविधान चौक, विधान भवन चौकमार्गे म.न.पा. मुख्यालयात रॅलीचा समारोप झाला.