प्रदूषित पाण्याच्या संदर्नंभात आयुक्तांनी केली पाहणी
पाण्याची गुणवत्ता मानकानुसार असल्याचे स्पष्ट
Date : 21 Apr 2026
या दौऱ्यात अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी) डॉ. श्वेता बॅनर्जी, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, तसेच मे. विश्वराज आणि मे. ऑरेंज सिटी वॉटरच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.
दौऱ्याची सुरुवात नासुप्र (NIT) द्वारे ढाबा येथे उभारण्यात आलेल्या ५ एमएलडी क्षमतेच्या एसटीपीपासून झाली. सध्या येथे केवळ २ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आयुक्तांनी वायूसेना नगर येथे सुरू असलेल्या 'वेअर' (Weir) बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम सांडपाण्याला मॅनहोलकडे वळवण्यासाठी केले जात आहे, जेणेकरून ते थेट एसटीपीपर्यंत पोहोचू शकेल. नासुप्रच्या अधीक्षक अभियंत्यांनी हे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले की, ज्या भागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी लाईन उपलब्ध आहे, तरीही जे लोक थेट नाल्यात सांडपाणी सोडत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
गोरेवाडा जंगल परिसरातून येणाऱ्या एका लहान ओढ्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रतिनिधींनी यापूर्वीच या भागाची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले असून, सध्या कोणतीही धोक्याची स्थिती नसल्याचे नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही, अधिक सुरक्षिततेसाठी आयुक्तांनी ओढ्याच्या मार्गावरील ३ विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेण्याचे आणि संपूर्ण परिसराचा ड्रोन सर्वेक्षण ' करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी माहिती दिली की, एकेकाळी गोरेवाडा हा नागपूरचा मुख्य जलस्त्रोत होता. मात्र, सध्या या तलावात पावसाचे आणि नवेगाव खैरी येथून पंप केलेले पाणी साठवले जाते. या तलावात शहराला ७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा असून, तेथील पाणी पेंच-१, २ आणि ३ या जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रियेसाठी नेता येते. तथापि, सध्या नवेगाव खैरीवरून थेट या केंद्रांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था असल्याने, गोरेवाड्याचे पाणी केवळ आपत्कालीन स्थितीत (उदा. वीज पुरवठा खंडित झाल्यास) वापरले जाते.
आयुक्त डॉ. विपीन यांनी नवेगाव खैरी आणि गोरेवाडा अशा दोन्ही ठिकाणच्या कच्च्या पाण्याच्या (Raw Water) चाचणी अहवालांची तपासणी केली. भारतीय मानकांनुसार (IS: 2296) पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांशी या अहवालांची तुलना केली असता, सर्व बाबी मर्यादेत असल्याचे (Within Limits) दिसून आले.
प्रक्रिया आणि पुरवठा: हे कच्चे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणल्यानंतर त्यावर 'एरेशन' (Aeration), 'क्लॅरिफ्लोक्युलेशन' (Clariflocculation), 'फिल्ट्रेशन' आणि 'डिस्इन्फेक्शन' (Disinfection) अशा कडक प्रक्रियेतून शुद्ध केले जाते आणि त्यानंतरच ते नागपूरकरांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाणी दूषित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.