मनपाच्या दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या लक्ष्मी हत्तीठेले, नासुप्रच्या विश्वस्त मंडळावर भाजपचे शेषराव गोतमारे
नामनिर्देशित नगरसेवक म्हणून 9 सदस्यांच्या नावांची घोषणा मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने मंजुरी
Date : 22 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. यावेळी शहराच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे दुर्बल घटक समिती व नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मनपाचे प्रतिनिधी म्हणून एका नगरसेवकाची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे मनपाचे नामनिर्देशित नगरसेवक म्हणून भाजप-शिवसेनेचे ७ व काँग्रेसच्या २ सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर यांच्यासह आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुर्बल घटक समिती गठीत
महानगरपालिकेतील मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजनेवर लक्ष वेधण्यासाठी मागासवर्गीय नगरसेवकांची दुर्बल घटक समिती गठीत करण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला. यासाठी मनपातील पक्षीय बलाबल अनुसार सदस्यांची नावे गटनेत्यांनी दिली. यात भाजपकडून कु. लक्ष्मी हत्तीठेले, श्री. योगेश पाचपोर, श्री. किरण मनपिया, श्री. तुषार लारोकर, श्रीमती दुर्गेश्वरी कोसेकर, श्री. योगेश मडावी व श्री. अमोल शामकुळे यांची नावे सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी महापौरांकडे दिली. काँग्रेसतर्फे श्री. मनीष बनसोड, श्री. विवेक निकोसे व श्रीमती सरस्वती सलामे यांची नावे विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर यांनी महापौरांकडे दिली तर मुस्लिम लिग-एमआयएमतर्फे श्रीमती वर्षा डोंगरे यांचे नाव गटनेते शकील पटेल यांनी महापौरांना दिले. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दुर्बल घटक समितीचे सदस्य म्हणून घोषणा केली तसेच अध्यक्षपदी श्रीमती लक्ष्मी हत्तीठेले यांना नियुक्ती एकमताने झाल्याचे जाहीर केले.
याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळावर मनपाचे प्रतिनिधी म्हणून एक सदस्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महापौरांनी सभागृहात मांडला. सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी भाजपचे श्री. शेषराव गोतमारे यांचे नाव प्रस्तावित केले. या नावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिल्यानंतर महापौरांनी श्री. गोतमारे यांच्या नावाची घोषणा केली.
मनपाचे नामनिर्देशित नगरसेवक म्हणून 9 सदस्यांची निवड झाल्याची घोषणा महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली. यात श्री. सुबोध आचार्य, श्री. देवेंद्र मेहर, श्री. विनोद बघेल, श्री. जितेंद्र ठाकूर, श्री. संजय ठाकरे, श्री. रितेश गावंडे (सर्व भाजप) व शिवसेनेचे श्री. सूरज गोजे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य म्हणून श्री. केतन ठाकरे व श्री. अतुल कोटेचा यांची निवड झाल्याची घोषणा महापौरांनी केली. या सर्व नवनियुक्त सदस्यांच्या नावाला सर्वसाधारण बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. सर्व नवनियुक्त सदस्यांचे महापौरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.