दहन घाटांवर पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 27 Apr 2026
शहरातील दहनघाटांची सद्यस्थिती व तेथील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या संदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची आज (ता. 27) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी आमदार श्री. कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती श्रीमती रुतिका मसराम, नगरसेवक श्री. दिलीप दिवे, नगरसेवक श्री. देवेंद्र मेहेर, नगरसेविका श्रीमती शीतल रारोकर, नगरसेविका श्रीमती सीमा ढोमणे, नगरसेविका श्रीमती शारदा बारई यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम शहरातील दहा झोनमध्ये असलेल्या 21 दहनघाटांची माहिती देण्यात आली. यावेळी या दहनघाटांवर असलेल्या सोईसुविधांची माहिती देण्यात आली. तसेच दहनघाटांच्या बळकटीकरण व तेथे पायाभूत सुविधांचे तयार करण्यासाठी पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. दहनघाटांचे बळकटीकरण व सौंदर्यीकरण करताना इतर शहारातील दहनघाटांची माहिती घ्यावी, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे दहन घाटांची नेमकी किती जागा आहे. या जागेला सुरक्षा भिंत बांधून तेथे असामाजिक तत्व शिरकाव करणार नाही, याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तात्काळ करावी, असेही निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.
अतिक्रमण झाल्यामुळे काही दहनघाटांमध्ये अंत्ययात्रा जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे अतिक्रमण करण्यासाठी तात्काळ नोटीस देण्यात याव्या, महानगरपालिकेच्या जागांच्या संदर्भात निश्चित माहिती विभागाने द्यावी, शहरातील इतर दहनघाटांवर असलेल्या पायाभूत सुविधा, तेथे असलेल्या नागरी सुविधा, एकूण कर्मचारी वर्गाची संख्या किती आहे, या संदर्भातील सखोल अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असेही निर्देश महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
दहन घाटावरील अतिक्रमण हटवावे – आमदार खोपडे
यावेळी बोलताना आमदार श्री. कृष्णा खोपडे यांनी वाठोडा व पारडी दहनघाटांच्या स्थितीची माहिती दिली. वाठोडा दहनघाटांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमा्णे पारडी घाटावर सुरक्षात भिंत नाही, या संदर्भात अधिकार्यांनी तात्काळ कारवाई करावे, असे निर्देश आमदार श्री. खोपडे यांनी दिले.