शुक्रवार १ मेपासून शहरात 'स्व गणनेला' सुरुवात 'स्व-गणना' करून घेत राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे मनपाचे आवाहन
१६ वी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा
Date : 28 Apr 2026
१६ व्या राष्ट्रीय जनगणनेसाठी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात या ४५०० प्रगणक आणि ७०० पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक प्रगणकावर साधारणतः ८०० नागरिकांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १ मे ते १५ मे या स्व-गणना कालावधीनंतर १६ मे ते १४ जून या काळात हे प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन 'HLO App' (House Listing Operation Application) च्या मदतीने माहितीची नोंदणी करतील.
नागरिकांनी आपली माहिती ऑनलाइन भरण्यासाठी se.census.gov.in या पोर्टलचा वापर करावा. मोबाईलसह संगणकाचा वापर करून करणे उत्तम ठरेल, पोर्टलवर १६ भाषांमध्ये माहिती भरता येणार आहे. कुटुंबप्रमुखाला पोर्टलवर लॉगिन करून माहिती भरल्यानंतर ११ अंकी 'एसई आयडी' तयार होईल. हा आयडी जतन करून ठेवणे आवश्यक आहे, कारण जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी सादर करणे अनिवार्य असेल.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले की, कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी कर्मचाऱ्यांना डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून त्रुटीविरहित डेटा संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्ष २०११ च्या जनगणना नुसार नागपूरची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ६६५ एवढी होती. यात पुरुषांची संख्या १२ लाख २५ हजार ४०५ तर महिलांची संख्या ११ लाख ८० हजार २६० एवढी आहे.
नागरिकांना घराची स्थिती, वापरलेले साहित्य आणि कुटुंबाशी संबंधित एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यात १. घरांचीस्थिती : इमारत क्रमांक (नगरपालिका/स्थानिक संस्था अथवा गणनाक्रमांक), गणनाघर क्रमांक, गणनाघराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा, गणनाघराची स्थिती, कुटुंब क्रमांक.
२. कुटुंबाचीमाहिती: कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, कुटुंबप्रमुखाचे लिंग, जर कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास, गणनाघराच्या मालकी हक्काची स्थिती, केवळ या कुटुंबाच्याताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या, या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या.
३. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी: पिण्याच्यापाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्यापाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता, प्रवर्गातील असल्यास, गणनाघराच्या शौचालयाचा प्रकार, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी/पीएनजी जोडणी, वापरण्यात येणारे मुख्य इंघन, आदी प्रश्न विचारल्या जाणार आहे.