नागपूरच्या उष्णतेत जीव वाचवा: पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी उन्हाळ्यातील काळजी
तापमान 45°C पेक्षा जास्त असताना, लहान उपाय मोठ्या धोक्यांपासून प्राण्यांचे संरक्षण करू शकतात डॉ. सनी मगर, पशुवैद्यकीय अधिकारी, MSU, NMC
Date : 29 Apr 2026
पाणी व आहार
प्राण्यांना नेहमी स्वच्छ व ताजे पिण्याचे पाणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची भांडी दिवसातून ३–४ वेळा स्वच्छ करून भरावीत. मांजरी विशेषतः साचलेले पाणी टाळतात, त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याचा फाउंटन वापरल्यास त्या अधिक पाणी पितात.
उन्हाळ्यात प्राण्यांची भूक कमी होते, त्यामुळे त्यांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा आहार द्यावा. दुपारच्या वेळेत ताक (कुत्र्यांसाठी), पातळ दही किंवा सूपसारखे द्रव आहार देणे उपयुक्त ठरते.
निवारा व तापमान नियंत्रण
प्राण्यांना थेट उन्हापासून दूर ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः दुपारच्या वेळी. त्यांना हवेशीर, सावलीत किंवा थंड वातावरणात ठेवावे.
उभ्या गाडीत प्राण्यांना ठेवणे जीवघेणे ठरू शकते. अभ्यासानुसार, गाडीतील तापमान केवळ ३० मिनिटांत ५°C पेक्षा जास्त वाढू शकते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. अतिशय थंड पाणी देणे टाळावे.
व्यायाम व जमिनीची सुरक्षितता
प्राण्यांचा व्यायाम सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावा. गरम रस्ते, वाळू किंवा लोखंडी पृष्ठभागामुळे त्यांच्या पंजांना भाजण्याचा धोका असतो.
सोप्पा नियम: जर जमिनीवर अनवाणी चालणे आपल्याला शक्य नसेल, तर ती जमीन प्राण्यांसाठीही खूप गरम आहे.
स्वच्छता व त्वचा काळजी
नियमित ब्रशिंग केल्याने सैल केस निघून जातात व त्वचेवर हवा खेळती राहते. मात्र, डबल कोट असलेल्या कुत्र्यांचे पूर्ण केस कापणे टाळावे, कारण त्यांचा कोट उष्णतेपासून संरक्षण करतो.
टिक्स व पिसूंचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात वाढतो, त्यामुळे नियमित डिवॉर्मिंग व परजीवी नियंत्रण आवश्यक आहे.
उष्णतेचा त्रास ओळखणे
अतिप्रमाणात धाप लागणे, लाळ येणे, सुस्ती, उलट्या होणे व शरीराचे तापमान वाढणे ही उष्णतेची लक्षणे आहेत. गंभीर अवस्थेत प्राणी बेशुद्ध पडू शकतो. अशा वेळी त्वरित थंडावा देऊन पशुवैद्यकीय उपचार घ्यावेत.
विशेष लक्ष: नागपूरमधील भटक्या कुत्र्यांची काळजी
नागपूरसारख्या शहरात तापमान 45°C पेक्षा जास्त असल्याने भटके कुत्रे अत्यंत असुरक्षित असतात. त्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे.
घर, दुकाने किंवा सार्वजनिक ठिकाणी सावलीत पाण्याची भांडी ठेवणे हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे. तसेच सावलीत विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
भटक्या कुत्र्यांना सकाळी किंवा संध्याकाळी हलका व सहज पचणारा आहार द्यावा. उष्णतेमुळे ते चिडचिडे होऊ शकतात, त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये व सुरक्षित अंतर राखावे.
गाड्या सुरू करण्यापूर्वी खाली पाहणे महत्त्वाचे आहे, कारण कुत्रे उष्णतेपासून बचावासाठी गाडीखाली आश्रय घेतात. नागरिक, स्थानिक प्रशासन व प्राणी कल्याण संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी, पुरेसे पाणी व निवारा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर, नागरिकांनी केलेले छोटे प्रयत्नही भटक्या प्राण्यांचे जीवन वाचवू शकतात.